छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा : डॉ. बालाजी जाधव
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्रा’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विशेष व्याख्यान
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University येथे ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्रा’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान आणि शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संभाजीनगर येथील व्याख्याते Dr. Balaji Jadhav यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या आदर्शातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू Dr. Prakash Mahanwar होते. यावेळी प्र-कुलगुरू Dr. Laxmikant Dama, प्रभारी कुलसचिव Dr. Atul Lakde, अध्यासन केंद्राचे समन्वयक Dr. Anil Ghanwat, रमेश चौंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक करताना अध्यासन केंद्राचे अध्यक्ष Prof. Sachin Gaikwad यांनी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधनात्मक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या व्याख्यानात डॉ. बालाजी जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक पैलूंवर प्रकाश टाकला. औरंगजेबाच्या अत्याचारांविरोधातील संघर्ष, स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आणि त्यांचे अद्वितीय नेतृत्व याविषयी त्यांनी प्रभावीपणे विवेचन केले. संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर संस्कृत, हिंदी आणि फारसीसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले विद्वान राजे होते, असे त्यांनी नमूद केले. ‘बुधभूषण’ या ग्रंथाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन राष्ट्रभक्ती, त्याग आणि धैर्याची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानानंतर सांगली येथील प्रसिद्ध शाहीर Avishkar Deshinge यांच्या शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित पोवाड्यांना विद्यार्थ्यांसह उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य Prof. Devanand Chilwant, परीक्षा संचालक Dr. Shrikant Andhare, वित्त व लेखाधिकारी CA Mahadev Kharade, अध्यासन केंद्राचे सदस्य Dr. Netaji Kokate, Dr. Vikas Shinde यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन Dr. Shivaji Shinde यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल घनवट यांनी मानले.
