डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. प्रवीण वक्ते यांची नियुक्ती
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय; ३२ महिन्यांचा कार्यकाळ
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University येथे प्र कुलगुरुपदी ‘केमिकल टेक्नॉलॉजी’ विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रवीण श्रीधरराव वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. कुलगुरु Dr. Vijay Fulari यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१८) आयोजित व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्र कुलगुरुपद ४ मार्च २०२६ पासून रिक्त होते. या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह १५ सदस्य प्रत्यक्ष तर चार सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने पूर्णवेळ प्रकुलगुरुपदासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्यांनी डॉ. प्रवीण वक्ते यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१४ च्या कलम १३ (६) अन्वये ही नियुक्ती करण्यात आली.

२७ वर्षांचा अध्यापन व संशोधनाचा अनुभव
डॉ. प्रवीण वक्ते गेल्या २७ वर्षांपासून विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात अध्यापन व संशोधन कार्य करीत आहेत. यापूर्वी त्यांनी ६ ऑगस्ट २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत प्रभारी प्रकुलगुरु म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
त्यांनी श्री संतपीठ पैठणचे समन्वयक, आयपीआर सेलचे संचालक, खरेदी समिती सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, परीक्षा मंडळ सदस्य, सिफार्टचे संचालक, बजाज इन्क्यूबेशनचे संचालक, नवोप्रक्रम मंडळ संचालक तसेच अधिष्ठाता मंडळाचे सदस्य सचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे.
मा. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते डॉ. वक्ते यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.
उच्च शिक्षण क्षेत्रातील सक्रिय योगदान
डॉ. वक्ते हे महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण परिषदेचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांनी पेटंट मिळविले असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. शहरातील गजानन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्य पाहत आहेत.
प्रभारी प्रकुलगुरु म्हणून उल्लेखनीय कामगिरी
सुमारे सव्वा वर्षे प्रभारी प्रकुलगुरु म्हणून काम करताना डॉ. वक्ते यांनी शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) प्रभावीपणे राबविले. तसेच विद्यापीठ प्रशासनातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. आता त्यांची पूर्णवेळ प्रकुलगुरु म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांना सुमारे ३२ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
