‘एमजीएम मॅरेथॉन २०२३’ चे आयोजन

बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनानिमित्त आयोजन

छत्रपती संभाजीनगर, दि. २१ : बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी मिशनच्या इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ आणि गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘एमजीएम मॅरेथॉन २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे उद्घाटन पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अपर्णा कक्कड, अधिष्ठाता डॉ.राजेंद्र बोहरा, प्राचार्य सरथ बाबू, प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी व सर्व संबंधितांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Advertisement

या दोन दिवसीय जनजागृतीपर मॅरेथॉनची सुरूवात बुधवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एमजीएम विद्यापीठ परिसरात होणार आहे. एमजीएम परिसरातून सुरू झालेली ही मॅरेथॉन गंगापूर रोड, शनीशिंगणापुर रोड, अहमदनगर, शिरूर, शिक्रापुर  या मार्गे गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ दुपारी १ : ३० वाजता महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे पोहचणार आहे. या मॅरेथॉन दरम्यान एमजीएम परिसर, क्रांती चौक, वाळूंज, गंगापुर रोड, नेवासा, शनीशिंगणापुर, शिक्रापुर आणि महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बाल शोषण प्रतिबंध जागतिक दिनाचे औचित्य साधून बालकांचे विविध प्रकारे होणाऱ्या बाल शोषणास प्रतिबंध करण्याकरिता त्याचप्रमाणे या संदर्भात समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी या ‘एमजीएम मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येते. मॅरेथॉनची सुरूवात एमजीएम विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर पासून होऊन शेवट महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे. मॅरेथॉनचे अंतर २४६ कि.मी. असून यामध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवणार आहेत. ‘बालशोषण थांबवा’ चा संदेश देत ही मॅरेथॉन ३२ तासांचा आपला प्रवास सुमारे १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या साक्षीने पूर्ण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page