गोंडवाना विद्यापीठात ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सुरू
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ येथे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, परीक्षा संचालक डॉ. धनराज पाटील, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते तसेच सिनेट सदस्य प्रा. उत्तमचंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक होईल. यामुळे मानवी त्रुटी कमी होऊन मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढणार आहे.
तसेच, ही प्रणाली वेगवान आणि कार्यक्षम असल्यामुळे निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळेल. डिजिटल पद्धतीमुळे माहितीची सुरक्षितता वाढेल, मूल्यमापनात एकसमानता राखली जाईल आणि कागदाच्या वापरात घट झाल्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळेल.
या केंद्राचे मुख्य मूल्यांकन अधिकारी म्हणून डॉ. नंदकिशोर मेश्राम तर सह-मूल्यांकन अधिकारी म्हणून डॉ. कृष्णा कारू कार्यभार पाहत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
