अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध

परीक्षा रद्द केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई / नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे NEET-UG 2026 परीक्षेमध्ये समोर आलेल्या गंभीर पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर संबंधित यंत्रणांनी NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण, संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभाविपने म्हटले आहे की, वर्षभर कठोर परिश्रम घेऊन परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांवर ही अत्यंत अन्यायकारक परिस्थिती ओढवली असून, या घटनेमुळे देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला आहे.

नाशिकपर्यंत पोहोचले पेपरफुटीचे धागेदोरे

विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांमधील वृत्तांनुसार, या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक पर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे. काही संशयित एजंट, दलाल आणि तथाकथित परीक्षा माफियांमार्फत मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियाद्वारे प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे तसेच परीक्षेपूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचल्याचे दावेही समोर आले असून, यामुळे देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

abvp-logo

“परीक्षा व्यवस्थेच्या पवित्रतेशी तडजोड सहन केली जाणार नाही”

अभाविपने स्पष्ट भूमिका घेत म्हटले आहे की राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या पवित्रतेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार होणे हे केवळ परीक्षा व्यवस्थेचे अपयश नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारे कृत्य असल्याचे परिषदने नमूद केले.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी म्हटले की, “अभाविप केंद्र सरकार, National Testing Agency (NTA) आणि संबंधित तपास यंत्रणांकडे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करते. नाशिकसह ज्या-ज्या ठिकाणांहून या रॅकेटचे संबंध समोर येत आहेत, त्या सर्व ठिकाणांची सखोल चौकशी करून परीक्षा माफिया, दलाल, संबंधित अधिकारी किंवा कोणत्याही प्रकारे सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका सुरक्षाव्यवस्था, डिजिटल मॉनिटरिंग, परीक्षा केंद्रांवरील देखरेख आणि उत्तरदायित्व यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविपचा लढा सुरूच राहणार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी संघटना पुढेही सातत्याने आवाज उठवत राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com