गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर विधान परिषदेचे सदस्य कृपाल तुमाने यांचे नामनिर्देशन
गडचिरोली | CampusKatta News | 7 जानेवारी 2026
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (भ) अन्वये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांच्या अधिकारातून नागपूर येथील विधानपरिषद सदस्य श्री. कृपाल तुमाने यांचे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या अधिसभेवर नामनिर्देशन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयांना मिळणार बळ
हे नामनिर्देशन विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तसेच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला अधिक बळ देणारे ठरणार असून, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासीबहुल व मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र असून, अशा परिस्थितीत अनुभवी लोकप्रतिनिधीचा अधिसभेतील सहभाग विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीस दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
नामनिर्देशनाचा कालावधी अडीच वर्षांचा
सदर नामनिर्देशनाचा कार्यकाळ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (ब) नुसार अडीच वर्षांचा राहणार असून, तो कलम 62 व 63 मधील तरतुदींनुसार अंमलात राहील.
