बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद

संगमेश्वर कॉलेज व विद्यापीठ अधिविभागास दुसरे तर केबीपी पंढरपूरला तिसरे बक्षीस!

वडाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20 व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले. तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले.

वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा विसावा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. समारोप समारंभास सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला.

चांगले काम करत जा, यश नक्की मिळेल – आर्ची-परश्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Advertisement

विद्यार्थ्यांनी चांगले काम केले पाहिजे. चांगले काम केल्यावर नक्की यश मिळणार, असा विश्वास सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी व्यक्त केला. आपल्या कामावर प्रेम केले पाहिजे, एक दिवस काम आपल्यावर प्रेम करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बोलून दाखविला. विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना यावेळी उत्तरे दिली. आकाश ठोसर म्हणाला, मी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पुण्यात जन्म झाला असला तरी सोलापूरच्या विद्यापीठातून माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीतून चांगले शिकावे आणि चांगले काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सैराटमधील डायलॉग म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, कोमल देशमुख, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, डॉ प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

ललित विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागाने पटकावले. वांग्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद डी ए व्ही वेलणकर महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ यशपाल खेडकर यांनी केले.

स्नेहल विधाते गोल्डन गर्ल तर
जैत शेख गोल्डन बॉय
युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते तर गोल्डन बॉयचा किताब संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी जैद शेख यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page