एमजीएम वृतपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या बाईमाणूसच्या इंग्रजी संकेतस्थळाचे खा शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम वृतपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने सुरु असलेल्या बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशनच्या इंग्रजी संकेतस्थळाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते रुक्मिणी सभागृह येथे करण्यात आले. यावेळी, खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, कुलपती अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ रेखा शेळके, बाईमाणूसचे संपादक प्रशांत पवार, बाईमाणूसमध्ये कार्यरत असणारे पत्रकार व सर्व संबंधित उपस्थित होते.
या उद्घाटनाप्रसंगी बोलताना खासदार पवार म्हणाले, भारतीय माध्यम क्षेत्रातील बाईमाणूस हा एक स्तुत्य उपक्रम असून अशा प्रकारच्या पोर्टलच्या माध्यमातून तळागाळातील घटनांना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. एमजीएम वृतपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने सुरु असलेल्या बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशनचे मी मनापासून कौतुक करतो.
राज्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, तृतीयपंथी आणि महिलांचे माध्यमातील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी बाईमाणूसने समाजातील याच शोषित वंचित घटकातील महिलांना पत्रकारितेचे प्रशिक्षण दिले. गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या उपेक्षित भागातील बाईमाणूसच्या महिला पत्रकार त्यांचे आजूबाजूचे जगणे बातमी आणि व्हिडिओच्या स्वरूपात मांडत आहेत. आता याच कहाण्या बाईमाणूसच्या इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती संपादक प्रशांत पवार यांनी यावेळी दिली.