उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती व्हावी याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती व्हावी यासाठी विद्यापीठात शुक्रवार दि २८ जून रोजी १२ वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

KBCNMU-GATE

विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने सकाळी १० वाजता सिनेट सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेत कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्यासह या नवीन अभ्यासक्रमाची माहिती देणारे तज्ज्ञ प्राध्यापक संवाद साधणार आहेत. या संवादामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमांची माहिती तसेच करिअरच्या संधी याविषयी माहिती मिळेल आणि शंकाचे निरसन देखील होणार आहे.

या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेत बी कॉम (बीएफएसआय), भौतिकशास्त्र प्रशाळेत बी एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) हे दोन नाविन्यपूर्ण चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स ॲण्ड पॉलिसी व महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत सुरु होणाऱ्या या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाची (ॲप्रेंटिसशिप) संधी मिळणार आहे.

Advertisement

याशिवाय विद्यापीठाने गतवर्षी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत संगणकशास्त्र प्रशाळेत बी एस्‍सी (कॉम्प्यूटर सायन्स), गणित शास्त्र प्रशाळेत बी एस्सी (मॅथेमेटीकल सायन्स) आणि सामाजि‍क शास्त्र प्रशाळेत बी ए (सोशल सायन्स) हे चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या पाच अभ्यासक्रमांची तसेच विद्यापीठाच्या विविध प्रशाळांमध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती आणि ओळख या कार्यशाळेत करून दिली जाणार आहेत. याशिवाय विद्यापीठातील सोयी – सुविधा, प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा याबद्दल देखील विद्यार्थी आणि पालकांना माहिती दिली जाईल. कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सील ऑफ इंडियाच्‍या पश्चिम विभागाचे संचालक मंगेश मिथे, प्रा रमेश सरदार, प्रा जयदीप साळी, प्रा एस आर कोल्हे हे देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

या पाच पदवी अभ्यासक्रमांसाठी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून www.nmu.ac.in या संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली आहे. यंदा प्रथमच विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन अंतर्गत गुणवत्ता निर्धार कक्षाचे संचालक प्रा समीर नारखेडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page