अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ एच एम धुर्वे यांना विद्यापीठात सामुहिक श्रद्धांजली
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ एच एम धुर्वे यांचे यवतमाळ येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाप्रसंगी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती जवळ शोकसभा संपन्न झाली. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे तसेच विद्यापीठाचे प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शोकसंवेदना व्यक्त करतांना कुलगुरू म्हणाले, डॉ एच एम धुर्वे हे यवतमाळ येथील बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयात 2004 पासून प्राध्यापक पदावर कार्यरत होते. अलीकडेच त्यांना उपप्राचार्य पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय ते महाविद्यालयाचे विश्वस्त सुद्धा होते. त्यांनी महाविद्यालयाला जवळपास वीस वर्षेे सेवा दिली आहे.
उत्कृष्ट काम करणारे, मनमिळावू, सर्वांना मदतीचा हात देणारे, विद्यार्थीप्रिय शिक्षक असा त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जनमाणसावर विशेष ठसा उमटविला. डॉ धुर्वे यांच्या दु:खद् निधनाने शिक्षण क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांवर जो दु:खाचा डोंगर कोसळला, ते दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना करून डॉ एच एम धुर्वे यांना विद्यापीठातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळले.