सुदृढ आरोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार करायला हवाय – प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे
गडचिरोली : भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनारायणाच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम पर्याय आहे. सूर्यनमस्कारामुळे उत्तम रितीने स्ट्रेचिंग होते. सांधे, स्नायू व अवयवांची सुद्रुढता वाढते. रक्ताभिसरण चांगले होते यासाठी प्रत्येकाने रोज किमान १४ सूर्यनमस्कार घातले पाहिजे. तसेच सामूहिक सूर्य नमस्कारातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते. तरुणांनी सुदृढ आणि संपन्न आरोग्यासाठी सूर्यनमस्कार केले पाहिजे, यामुळे ऊर्जावान तरुण निर्माण होऊन बलशाली भारत उदयास येऊ शकेल असे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठात आयोजीत सूर्यनमस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. रथसप्तमी चे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण,संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम,योगशास्त्राचे अभ्यासक मिलिंद उमरे उपस्थित होते.
आर्ट ऑफ लिविंगच्या योग शिक्षिका अंजली कुळमेथे, यांनी विविध आसने, प्राणायाम आणि मंत्रोच्चाराचे महत्व अधोरेखित करीत व्यायामामुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडतात आणि रक्तभिसरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. आज मनुष्याचे आयुष्यमान कमी झाले असून शरीर व मनाची एकाग्रता वाढवणे खूप आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सूर्यनमस्कार आणि मेडिटेशन चे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाला उपकुलसचिव वित्त व लेखाविभाग देवेंद्र झाडे,सिनेट सदस्य सतीश पडोळे,जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांच्यासह शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन योगशास्त्राचे अभ्यासक मिलिंद उमरे, आभार संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. अनिता लोखंडे यांनी मानले.