बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात अभाविपचे आंदोलन ; विविध समस्यांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश
पुणे : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे विविध समस्यांविरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना न देता हॉस्टेल नियमांमध्ये करण्यात येणारे बदल, स्टुडन्ट कौन्सिल निवडणुका वेळेत न होणे, विद्यार्थ्यांवर जातीविषयक टिप्पणी व भेदभाव, विद्यार्थिनी वसतिगृहातील मानसिक व शाब्दिक छळ, तसेच मुलींच्या वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा अशा एकूण २० मागण्यांवर हे आंदोलन केंद्रित होते.

विद्यार्थ्यांच्या मते, या सर्व मागण्या मूलभूत स्वरूपाच्या असून यापूर्वी दोन वेळा महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्रोश आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी बोलताना पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांनी सांगितले की, “बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय हे पुण्यातील प्रतिष्ठित महाविद्यालय असूनही येथे मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना दिली जाणारी वागणूक अत्यंत निंदनीय आहे. या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत, तर विद्यार्थी परिषद यापेक्षा तीव्र आंदोलन उभारेल.”

या आंदोलनामुळे महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
