बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कवी संमेलन संपन्न
कवी संमेलनातून मराठी भाषेचे संवर्धन
जळगाव |
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राअंतर्गत १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. १९ जानेवारी २०२६ रोजी मान्यवर कवींचे कवी संमेलन उत्साहात पार पडले.
या कवी संमेलनासाठी जळगावच्या कवयित्री पुष्पा साळवे, वडजी (ता. भडगाव) येथील कवी डॉ. वाल्मीक अहिरे आणि धुळे येथील कवी अरविंदा भामरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे होते.

कवी संमेलनाच्या तीन फेऱ्या पार पडल्या. पहिल्या फेरीत कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘श्रमिक’ या कवितेतून श्रमिक जीवनाचे महत्त्व मांडले. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘जा मी नाही खात’ या बालकवितेतून लहान मुलीचे भावविश्व सादर केले, तर अरविंदा भामरे यांनी ‘आसवांचा विद्रोह’ या कवितासंग्रहातील कविता सादर करत जातीपातीतील विदारक वास्तव अधोरेखित केले. यावेळी अध्यक्ष प्रा. पगारे यांनी ‘बा, तथागता!’ या विशाल काव्यातील विवेकी सत्याचा शोध घेणारे उद्धरण सादर केले.
दुसऱ्या फेरीत पुष्पा साळवे यांनी ‘पुस्तक’ या कवितेतून वाचनाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘काळ्या काळ्या पोरीसंग लगीन लावलं मामांनं’ या कवितेतून गुणांना दिलेले महत्त्व अधोरेखित केले. अरविंदा भामरे यांनी ‘लेकरांसाठीची आई’ या कवितेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचे दुःख प्रभावीपणे मांडले. यावेळी प्रा. पगारे यांनी ‘प्रज्ञास्पंदनेचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातील मृत्यू विषयक चिंतनात्मक काव्यवेचांचे सादरीकरण केले.
तिसऱ्या फेरीत कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘बाईपण’ या कवितेतून स्त्रीच्या विविध भूमिका आणि वेदना प्रभावीपणे मांडल्या. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘बाप’ या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पिढीजात संस्कारमूल्ये अधोरेखित केली. अरविंदा भामरे यांनी ‘फाईल’ या कवितेतून सरकारी दप्तर दिरंगाई आणि बेरोजगार तरुणाचे वास्तव सादर केले.
याच फेरीत मराठी विभागाच्या डॉ. भारती सोनवणे यांनी ‘तिच्या जखमांचा नासूर’ ही कविता सादर केली, तर एम.ए. इंग्रजी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी योगेश पाटोळे याने ‘बाप’ ही स्वलिखित कविता सादर करून उपस्थितांची मने हेलावली.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी ‘बा, तथागता!’ या काव्यातील माणूसपणाचे मर्म सांगणाऱ्या ओळी सादर करून केला. या कवी संमेलनास मराठी, हिंदी व इंग्रजी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सोनवणे यांनी केले तर डॉ. दीपक खरात यांनी आभार मानले.
