राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रोजगारक्षम कौशल्य क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन
विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विभागांतील १२०० विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने रोजगार कौशल्य क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा महिंद्रा अँड महिंद्रा प्राइड क्लासरूम अंतर्गत नांदी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, सोमवार दि. 19 जानेवारी 2026 रोजी विद्यापीठातील तीन पदव्युत्तर विभागांमध्ये कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
विद्यापीठातील विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांसाठी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तीन दिवसीय कार्यशाळा विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर केंद्रित आहे.

तीन विभागांत कार्यशाळेचा शुभारंभ
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. 19 जानेवारी 2026 रोजी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व प्राणीशास्त्र विभागात कार्यशाळेची सुरुवात झाली.
रसायनशास्त्र विभागातील उद्घाटन कार्यक्रमाला
विभाग प्रमुख व आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, प्रशिक्षक मेघना दुबे व डॉ. विजय तांगडे उपस्थित होते.
भौतिकशास्त्र विभागातील उद्घाटन कार्यक्रमाला
विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, डॉ. अभय देशमुख, डॉ. स्मिता आचार्य तसेच प्रशिक्षक ॲड. पल्लवी माटे उपस्थित होते.
प्राणीशास्त्र विभागातील उद्घाटन कार्यक्रमाला
विभाग प्रमुख डॉ. वंदना धुर्वे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन व प्रशिक्षक नव्या मोहता उपस्थित होते.
कार्यशाळेचा उद्देश व प्रशिक्षणाचे स्वरूप
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोजगार व नोकरीसाठी आवश्यक तयारी,
- प्रभावी रेझ्युमे (परिचयपत्र) तयार करणे,
- मुलाखतीसाठी आत्मविश्वासपूर्वक तयारी,
- संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास
याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती डॉ. भूषण महाजन यांनी दिली.
प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना धुर्वे यांनी सांगितले की, स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या दृष्टीने सर्वोत्तम तयारी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच शासकीय व खासगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून, पुढील काळात विद्यापीठातील इतर शैक्षणिक विभागांमध्येही या कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.
