राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतीगृहात सशक्तिकरण कार्यशाळा
नागपूर |
विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्य सुदृढीकरणासाठी तणाव व्यवस्थापन व भावनिक सशक्तिकरण कार्यशाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसरातील विद्यार्थिनी वसतीगृहात शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली.
आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनशैलीत विद्यार्थिनींमध्ये वाढत असलेला मानसिक तणाव, भावनिक अस्थिरता व आत्मविश्वासाची कमतरता लक्षात घेता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतीगृहाच्या वरिष्ठ अधिक्षिका डॉ. विजयता उईके होत्या, तर ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अधिक्शिका सौ. सरोज लांजेवार यांनी धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थिनींनी तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
तणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन
प्रमुख अतिथी डॉ. संयुक्ता थोरात यांनी तणावाची कारणे, मानसिक आरोग्याचे महत्त्व व भावनिक समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले अनुभवाधारित उपाय सोप्या पद्धतीने विद्यार्थिनींसमोर मांडले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध अनुभवाधारित व भावनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बलून ॲक्टिव्हिटी, ड्रीम ॲक्टिव्हिटी, सॉंग ॲक्टिव्हिटी, लाफिंग ॲक्टिव्हिटी तसेच वृत्तपत्र वाचन उपक्रम यांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करता आल्या तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत झाली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असून, तणावमुक्त, आत्मविश्वासी व संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे उपस्थित विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सौ. सरोज लांजेवार यांनी केले.
