यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे कृषी विज्ञान केंद्रात किसान सुसंवाद कार्यक्रम
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी सक्षमीकरणावर भर
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन कटीबद्ध – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
नाशिक | Campuskatta News : देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासन पूर्णतः कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी, सिंचन, पशुपालन व कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

🌾 किसान सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे नाशिक येथे आयोजित किसान सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर –
- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे
- प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन
- ICAR नवी दिल्लीचे सहाय्यक महानिदेशक डॉ. राजश्री रॉय बर्मन
- संचालक डॉ. एस. के. रॉय
- कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे
- कृषि विभागाचे संचालक श्री. रफिक नायकवाडी
- वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितिन ठोके
यांची प्रमुख उपस्थिती होती.
🚜 शेतकरी सेवा म्हणजे ईश्वर सेवा
केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले,
“प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आम्ही देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कारण शेतकरी जे उत्पादन करतो ते कोणतेही मशीन, एआय किंवा रोबोट करू शकत नाही.”
शेतमाल प्रक्रिया केंद्रांसाठी मदत देण्याबाबत राज्य शासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काही शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचत नाही, ही बाब लक्षात घेऊन अधिक प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
🌱 एकात्मिक शेतीचा आग्रह
लहरी हवामान व कमी शेती क्षेत्र असलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी
एकात्मिक शेती पद्धती (Integrated Farming) स्वीकारावी, असे आवाहन करत त्यांनी –
- पशुपालन
- कुक्कुटपालन
- मत्स्यपालन
- मधमाशीपालन
- फळे, फुले व भाजीपाला
यांसारख्या पूरक व्यवसायांची जोड देण्याचा सल्ला दिला.

🧪 नवीन कृषी उत्पादनाचे लोकार्पण
यावेळी मंत्री श्री. चौहान यांच्या हस्ते
‘यश मायक्रो – न्यूट्रीएंट्स ग्रेड-२’ या सूक्ष्म अन्नद्रव्य उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.
👩🌾 महिला बचतगट व शेतकऱ्यांशी संवाद
कार्यक्रमानिमित्त महिला स्वयंसहायता बचत गट व शेतीविषयक स्टॉलना भेट देत त्यांनी महिला व शेतकरी वर्गाशी संवाद साधला. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात बहावा वृक्षारोपण करण्यात आले.
मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी व मशरूम उद्योजिका वैशाली उदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली.
प्रास्ताविक कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. शाम कडूस पाटील यांनी केले.
कार्यक्रमास शेतकरी, महिला बचतगट सदस्य व विद्यापीठ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
