राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात भारतीय भाषा दिन निमित्त व्याख्यान
एकात्मिक जीवन भारतीय संस्कृतीचा गाभा — पद्मश्री निवेदिता दीदी
नागपूर : एकात्मिक जीवनाचे तत्त्वज्ञान हेच भारतीय संस्कृतीचे खरे सार आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ. निवेदिता दीदी भिडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात भारतीय भाषा दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी अध्यक्ष स्थानी होते, तर विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे उपस्थित होते.
डॉ. निवेदिता दीदींनी भारतीय संस्कृतीचे मूलाधार — जीवनतत्त्वज्ञान, मूल्ये आणि जीवनव्यवस्था — यावर प्रकाश टाकत भारतीय संस्कृती परस्परसंबंधित व परस्परपूरक असल्याचे सांगितले.

त्या म्हणाल्या, भारतात देव, निसर्ग, प्राणी, नद्या, पर्वत यांचा सन्मान केला जातो; हीच भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की भारतीय समाजात कोणताही धर्म श्रेष्ठत्वाचा दावा करत नाही, हीच खरी एकात्मतेची भावना आहे.
स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या आध्यात्मिक दृष्टीची आठवण करून देत दीदींनी सांगितले की आपली संस्कृती, धर्म आणि मूल्ये आपणच विसरत चाललो आहोत. कुटुंबांमध्ये संवाद, आत्मनियंत्रण आणि मूल्यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कोरेटी यांनी शब्द आणि कृतीतील सुसंगततेचे महत्व सांगत भारतीय मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.
डॉ. पांडे यांनी सुब्रमण्य भारती जयंती ‘भारतीय भाषा दिन’ म्हणून साजरी केल्याची माहिती दिली व भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात विविध मान्यवर, प्राध्यापक, संशोधक आणि नागपूरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
