गोंडवाना विद्यापीठात आकाश निरीक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली : दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.30 ते 12.30 पर्यंत गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागामार्फत आकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान गुरु, शनी आणि चंद्र या ग्रहांचे तसेच त्यांच्या उपग्रहांचे दूरदर्शकामार्फत निरीक्षण करण्यात आले. यासोबतच ओरायन बेल्ट नक्षत्रातील ताऱ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी रसपूर्वक केला. निरीक्षणासह विद्यार्थ्यांनी ताऱ्यांमागील रहस्य, ग्रहांची निर्मिती, विश्वाची रचना व सृष्टीचा विस्तार यांसारख्या खगोलशास्त्रीय विषयांवर विचारमंथनही केले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ. प्रितेश जाधव, केंद्रीय उपकरण सुविधा केंद्राचे समन्वयक डॉ. नंदकिशोर मेश्राम, प्रा. विकास पुनसे आणि भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अपर्णा भाके यांनी केले.

विद्यापीठात उपलब्ध असलेले दूरदर्शक आणि वैज्ञानिक उपकरणे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत मिळालेली असून, भविष्यात आणखी अत्याधुनिक उपकरणे विद्यापीठाला उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. प्रितेश जाधव यांनी दिलीय.
आकाश निरीक्षण कार्यक्रमाचा लाभ कोण घेऊ शकत
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने कळविले आहे की, इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांच्या मागणीनुसार अशा प्रकारचे आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करून दिले जाऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञानाविषयीची आवड वाढण्यास मदत होईल.
सदर उपक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभत असल्याचे भौतिकशास्त्र विभागाने नमूद केले.
