श्रीराम राजूरकर यांना जागतिक परिषदेत ‘सर्वोत्तम प्रकाशन’ पुरस्कार
डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचा अभिमान
कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्रीराम राजूरकर यांना एडलेड (ऑस्ट्रेलिया) येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड काँग्रेस २०२५ मध्ये ‘प्रो. सुंग सिल चू बेस्ट स्टुडंट पब्लिकेशन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार त्यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र विषयातील त्यांच्या पीएच.डी. संशोधनासाठी प्रदान करण्यात आला असून, त्यासोबत ४०० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक देण्यात आले. हा पुरस्कार वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन योगदानासाठी दिला जातो. विशेष म्हणजे, हा पुरस्कार मिळवणारे श्रीराम राजूरकर हे भारताचे केवळ दुसरे वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत. या कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या जागतिक परिषदेत श्रीराम राजूरकर यांनी दोन मौखिक सादरीकरणे केली, ज्यातून भारताच्या संशोधन क्षमतेचे प्रभावी दर्शन घडले. परिषदेत १२० हून अधिक देशांतील १००० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच, या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी त्यांना भारत सरकारच्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडून अनुदानही प्राप्त झाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. सी. डी. लोखंडे यांनी श्रीराम राजूरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
