राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिवरायांचा भव्य पुतळा उभारणीला सुरुवात
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगातील सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज झाली. विद्यापीठाच्या महाराज बाग चौकातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते निर्माण कार्याचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार अभिजीत वंजारी, माजी महापौर शेखर सावरबांधे, समितीचे सचिव मंगेश डुके, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, विद्यापीठ अभियंता विनोद इलमे, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे आणि केसीसी कन्स्ट्रक्शनचे जयंतराव खडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपतींच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हा पुतळा उभारला जात असून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. इतिहासकारांनी नोंदवलेल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तपशीलावर आधारित या पुतळ्याची रचना केली जाणार आहे. पुतळ्यासोबत संग्रहालय आणि ग्रंथालय उभारून शिवरायांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास प्रदर्शित केला जाणार आहे. या निर्मितीस लोकसहभागातून निधी उभारला जात आहे.
जगातील अद्वितीय पुतळा
- कांस्य धातूचा ३२ फूट उंच सिंहासनारूढ पुतळा, त्यावरील ७ फूट उंच छत्र
- १०,००० किलो वजन, हातात राजदंड
- अशा स्वरूपाचा राजदंडधारी पुतळा जगातील पहिलाच ठरणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर विद्यापीठ परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि प्रेरणादायी कार्याची ऐतिहासिक ओळख जपणारे नवे सांस्कृतिक केंद्र म्हणून उजळून निघेल.

