डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नायपर व जीपॅट परीक्षेत यश
जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदूमफार्मसी कॉलेजचे विद्यार्थी अथर्व स्वामी, हर्षद कांबळे, अनिष लड्डा आणि प्रतीक लोखंडे यांनी नायपर-जीईई २०२५ (राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था) व जीपॅट-२०२५ (पदवीधर फार्मसी अभियोग्यता चाचणी) च्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत घवघवित यश संपादन केले. ही परीक्षा यावर्षीच्या मे आणि जून या महिन्यात घेण्यात आली होती. नुकताच या वर्षीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये अथर्व स्वामी व हर्षद कांबळे यांनी नायपर आणि जीपॅट, तर अनिष लड्डा याने नायपर आणि प्रतीक लोखंडे याने जीपॅटमध्ये उत्तीर्ण होऊन सर्वांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. भारतामध्ये पुढील शिक्षणासाठी जीपॅट व नायपर ह्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षा असून, नायपर परीक्षा औषधनिर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम फार्मसी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यंदाची ही परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या मोहाली, पंजाब या शाखेमार्फत घेण्यात आली होती.
या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नायपरच्या नामांकित राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच अनेक उच्चशिक्षणाचे पर्याय खुले होणार आहेत. तर जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एम. फार्मसी प्रवेश तसेच ३ लाख रुपये शिष्यवृत्ती साठी पात्र असतात. विद्यार्थ्यांच्या या अग्रगण्य यशामुळे डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शितलकुमार पाटील, उपप्राचार्य डॉ सतीश किलजे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती समन्वयक प्रा शुभम पाटील आदींचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.
यावेळी डॉ. जे. जे. मगदूम संस्थेचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस-चेअरपर्सन अॅड. डॉ. सोनाली मगदूम व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील, उपप्राचार्य डॉ. सतीश किलजे आदि उपस्थित होते.
