कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी अमरावती विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संवाद सभा

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची धुरा ज्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली गतिमान आहे आणि त्यांनी अल्प कर्मचारी संख्या असूनही कर्मचाऱ्यांमध्ये संस्थेविषयी आपुलकी निर्माण करून विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा इतर विद्यापीठांच्या तुलनेत अधिक गतिशील करून दाखविली मिलींद असे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी नुकताच विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात विद्यापीठ कर्मचाऱ्यांशी एका विशेष संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे उपस्थित होते. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कुलगुरू आणि कर्मचा­ऱ्यांमध्ये संवाद सभा संपन्न झाली.

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते संवाद साधतांना

संवाद सभेचा मुख्य उद्देश कुलगुरू आणि कर्मचारी यांच्यातील संवाद वाढवणे, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या संधींवर चर्चा करणे होता. याप्रसंगी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठाने लागू केले आहे, त्यामुळे ते समजून घेऊन त्याची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेण्याची गरज आहे. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाची सद्यस्थिती व आगामी योजनांबद्दल तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय उदिष्टांबद्दल विस्तृत माहिती दिली.

विद्यापीठाला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत. या विद्यापीठाचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी आजवर अथक परिश्रम घेऊन विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे, याबद्दल कुलगुरूंनी सर्वांचे कौतुक करून सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या विकासात आणखी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कर्मचाऱ्यांनीही आपली मते, सूचना आणि काही समस्या कुलगुरूंसमोर मांडल्या. कुलगुरूंनी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले आणि त्यावर योग्य विचार करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिलीत आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.

या संवाद सभेमुळे कुलगुरू आणि कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या भूमिका समजून घेण्यास आणि भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यास या संवाद सभेमुळे व्यासपीठ मिळाल्याची भावना कर्मचा­यांनी मांडून आनंद व्यक्त केला. संवाद सभेचे संचालन कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक रमेश जाधव यांनी केले. यावेळी वर्ग 2 ते 4 पर्यंतचे सर्व कर्मचारी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com