‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘मराठी भाषा, संस्कृती आणि स्त्रीवाद’ या विषयावर संवाद कार्यक्रम संपन्न

स्त्री-पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू – डॉ गीताली वि म

डॉ योगिनी सातारकर यांनी साधला ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंताशी संवाद

नांदेड : स्त्री पुरुष विषमता ही मानवी जगण्याची काळी बाजू असून पुरुष प्रधान समाजात सत्तेच्या राजकारणात भाषेच्या माध्यमातून होणारी विषमता स्त्रीवाद नाकारतो असे परखड मत ‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकाच्या संपादक आणि पुणे येथील जेष्ठ स्त्रीवादी विचारवंत डॉ गीताली वि म यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वांग्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि डॉ शंकराव चव्हाण अध्यासन केंद्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘मराठी भाषा, संस्कृती आणि स्त्रीवाद’ या विषयावर डॉ योगिनी सातारकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण होते.

Dialogue program on 'Marathi Language, Culture and Feminism' concluded at SRTMU Nanded

डॉ. योगिनी सातारकर यांनी गीताली वि म यांचा परिचय करून देत त्यांनी १९८० च्या दशकात केलेले सुरुवातीचे सामाजिक कार्य, फर्ग्युसन महाविद्यालयातील अध्यापन, निगराणी, नारी समता मंच, शाश्वत, निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असे त्यांचे संस्थात्मक कार्य आणि विशेषतः ‘माझ्या पुरुषत्वाचा प्रवास’ आणि ‘बापलेक नात्याचा कॅलिडोस्कोप’ ही गीतालींची पुस्तके या संदर्भाने प्रश्न विचारत त्यांच्याशी दीर्घ संवाद साधला.

स्त्री चळवळीचे स्वरूप हे पुरुष विरोधी आणि केवळ स्त्रियांसाठी असे नाही हे नमूद करत पुरुष प्रधान संस्कृती, जात व धर्म, विषमता आणि संवादाची गरज यावर गीताली यांनी प्रकाश टाकला आणि भारतीय संविधानाला ७५ आणि आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षाला ५० वर्षे पूर्ण झाली असून आपण कालबाह्य विषमतावादी रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच आणि पुरुषस्पंदन या त्यांच्या नियतकालिकांच्या संदर्भात आणि एकूणच प्रत्यक्ष जीवनात स्त्री व पुरुषांना येणाऱ्या अनुभवांवर आधारित प्रश्न उपस्थित प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनी विचारले. डॉ वैजनाथ अनमुलवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ घनश्याम येळणे, डॉ रमेश ढगे, डॉ शैलजा वाडीकर, डॉ सुहास पाठक, डॉ पाटोडे, डॉ नीना गोगटे, प्रा झिशान अली यांच्यासह संशोधक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com