नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात ‘जस्टा काॅजा’ महोत्सवात राष्ट्रीय न्याय प्रक्रिया स्पर्धा संपन्न

ट्रायल ॲडव्होकेसीतून अनुभवली न्यायप्रक्रिया

दीक्षांत सभागृहात अवतरले न्यायालय

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील ‘जस्टा काॅजा’ महोत्सवात आयोजित ‘ट्रायल ॲडव्होकेसी’ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष न्यायालयाचे कामकाज रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी अनुभवले. महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक परिसरातील दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय न्याय प्रक्रिया स्पर्धेच्या निमित्ताने जणू न्यायालयाच अवतरले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एम एस जवळकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती ए एल पानसरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविशंकर मोर, विद्यापीठ अधिसभा सदस्य दिनेश शेराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या वतीने २२ व्या ‘जस्टा काॅजा’ या राष्ट्रीय विधी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Advertisement

या महोत्सवाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ट्रायल ॲडव्होकेसी स्पर्धा ही प्रथमच आयोजित करण्यात आली. न्यायालयात प्रत्यक्ष कामकाज करताना उत्कृष्ट वकिलीचे कौशल्य अत्यंत कठीण अशा तीन फेरीत आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार होते. दीक्षांत सभागृहात आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक यासह अन्य राज्यातील एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय तसेच नागपूर येथील सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय यांच्या दरम्यान अत्यंत चुरसपूर्ण स्पर्धा रंगली. स्पर्धेची सुरुवात फिर्यादी आणि बचाव पक्षाच्या सुरुवातीच्या विधानांनी झाली. त्यानंतर मुख्य आणि विरोधी साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात आली. खंडपीठाच्या चौकशीला कुशलतेने संबोधित करून, दोन्ही बाजूंनी विचारप्रवर्तक युक्तिवादांसह त्यांची प्रकरणे सादर केली.

स्पर्धेनंतर, न्यायाधीशांनी ‘ट्रायल ॲडव्होकेसी’ स्पर्धेत सहभागी आणि महाविद्यालयाचे स्पर्धेच्या आयोजनाबाबत कौतुक केले. न्यायमूर्ती ए एल पानसरे यांनी मार्गदर्शन करताना प्रत्यक्ष वकिली करण्याच्या महत्त्वावर भर देत सिद्धांतिक स्पर्धा आणि वास्तविक जगातील कायदेशीर सराव यांच्यामधील फरक समजावून सांगितला. सोबतच विद्यार्थ्यांना कायद्याच्या ज्ञानात सातत्याने वाढ करण्याचे आवाहन केले. बचाव पक्षाच्या भूमिकेचे न्यायदानातील महत्त्व त्यांनी स्पष्ट करून सांगितले.

न्यायालयात केलेल्या कामकाजाच्या प्रत्यक्ष मिळालेल्या अमूल्य ज्ञानाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. आपल्या आठवणी सांगताना विविध मानसिकता असलेल्या लोकांकडून कशाप्रकारे गुन्हे केले जातात आणि त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई केली जाते. त्या कशा समजून घेतल्या पाहिजे, याबाबत त्यांनी माहिती दिली. न्यायमूर्ती एम.एस. जवळकर यांनी या प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी म्हणून अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. विधीक्षेत्रात उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी ‘जस्टा काॅजा’ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी महोत्सवाच्या समन्वयक डॉ प्रविणा खोब्रागडे व सहसमन्वयक डॉ अधरा देशपांडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन झिंदीगी आचार्य व असिधारा लांजेवार यांनी केले तर आभार अद्वैत मंगरूळकर यांनी मानले. आयोजनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा मृण्मयी कुकडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page