महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात कुलगुरु यांचा विद्यार्थ्याशी संवाद
स्वअनुशासन यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली – कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे प्रतिपादन
पुणे : यशस्वी जीवनासाठी स्वअनुशासनाचेे पालन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे पुणे आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) होत्या समवेत आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर कमांडंट लेफ्ट जनरल संदीप थरेजा, प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता मेजर जनरल गिरिराज सिंग, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, उपकुलसचिव डॉ सुनिल फुगारे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच व्यक्तीमत्व विकासाच्या अन्य बाबींवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. याकरीता आपल्या भोवताली घडणाऱ्या घडामोडी व त्यावर समाजाला उपयोगी संशोधन याचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबिवण्यात येतात त्यामध्ये सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संलग्नित महाविद्यालयांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान यांच्या ’विकसित भारत’ संकल्पनेतील संशोधन हा महत्वाचा घटक आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना मांडणे गरजेचे आहे. विविध विद्याशाखांचे विद्यार्थ्यांनी इतर आरोग्य विद्याशाखांचा आदर राखून रुग्णसेवेला प्राधान्य दिले पाहिजे.
त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या संशोधनाच्या कल्पना योग्य व्यासपीठाव्दारे मांडणे व त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी ’इलनेस टू वेलनेस’ प्रवास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर कमांडंट लेफ्ट जनरल संदीप थरेजा यांनी सांगितले की, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता असतांना लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर यांनी अनेक विविध उपक्रम सुरु केले होते ते आजही यशस्वीरित्या सुरु असून त्याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी कुलगुरुंचा संवाद हा अतिशय वेगळा उपक्रम असून विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. यासाठी विद्यार्थ्यांकरीता विविध योजना राबविण्यात येतात त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. कला, संशोधन, क्रीडा आदी क्षेत्रातही आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्नशील रहावे. कुलगुरु कट्टयाच्या माध्यमातून आपणांस थेट कुलगुरु महोदयांशी संवाद साधता येणार आहे हा आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विविध संलग्नित महाविद्यालयात कुलगुरु कट्टयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा कुलगुरु महोदया यांचा अभिनव उपक्रम आहे. विद्यार्थ्यांशी करण्यात आलेल्या संवादातून विद्यापीठाला मोठया प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात येतील जेणे करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे सुलभ होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यातील ’कुलगुरु कट्टा’ हा पुणे येथे सातवा कार्यक्रम आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले.
यावेळी संदीप राठोड यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा समर इंटर्नशिप प्रोग्राम विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर कमांडंट लेफ्ट जनरल संदीप थरेजा व आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता मेजर जनरल गिरिराज सिंग यांचा कुलगुरु महोदया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार डॉ देवेंद्र पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी बी जे सोनकांबळे, ब्रिड डॉ सुबोध मुळगुंद, डॉ मृणाल पाटील, ऍड संदीप कुलकर्णी, प्रकाश पाटील, योगिता पाटील, शिल्पा पवार, डॉ सुप्रिया पालवे, उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर, अविनाश सोनवणे, दिप्तेश केदारे, अर्जुन नागलोथ, पुष्कर तऱ्हाळ, विनायक ढोले, सोहम वानेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या विविध विद्याशाखांतील व महाविद्यालयातील सुमारे तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.