राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागात युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा
चारित्र्यसंपन्न युवकांची पिढी घडवावी लागेल – डॉ धर्मेंद्र तुरकर यांचे प्रतिपादन
नागपूर : स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असणारा भारत घडवायचा असेल तर देशात चारित्र्यसंपन्न युवकांची पिढी तयार करावी लागेल. यातून आपल्या देशाच्या उज्वल भविष्याची आशा बाळगता येईल, असे प्रतिपादन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेज नागपूर येथील डॉ धर्मेंद्र तुरकर यांनी केले. पदव्युत्तर इतिहास विभागात स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) निमित्त आयोजित ‘स्वामी विवेकानंद : युवकांचे प्रेरणास्थान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. युवा दिनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ धर्मेंद्र तुरकर बोलत होते.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेज नागपूर येथील डॉ धर्मेंद्र तुरकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे मार्गदर्शन करताना डॉ तूरकर यांनी कठीण परिस्थितीवर मात करतो तो युवा असल्याचे सांगितले. परिस्थितीला न घाबरता सामोर जातो तो युवा, युवाचं उलट केल्यास वायू होतो. वायू नियंत्रित असल्यास आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. अन्यथा अनियंत्रित वायू विनाशकारी ठरू शकते, असे ते म्हणाले. शिकागोत राहून भारताविषयी चिंतन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होय.
यासोबतच एच ३ हार्ट, हेड अँड हॅन्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही भारताचे उत्तराधिकारी आहात. मनापासून भारतीय विषयीच्या विचार अंमलात आणणारी डोक्यात योजना आणि योजना कार्यरत करणारे हात असेल तर भारत शक्तिशाली होईल भारताला शक्तिशाली बनविण्यासाठी चारित्र्य संपन्न युवकांची गरज आहे, असे स्वामींनी म्हटल्याचेही डॉ. तुरकर यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या वरील अशा असंख्य बाबींचा उलगडा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केला.
एका भाषणात विवेकानंद म्हणतात, मला सळसळत्या रक्ताचे शंभर युवक द्या मी या देशाची गरिमा पुन्हा परत आणून देतो. चरित्र संपन्न युवक या देशाचे आधारस्तंभ आहे आणि समाजाच्या नव निर्मितीसाठी त्यांनी समोर यायला पाहिजे. युवकांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास जागृत करायचा असल्यास विवेकानंदांच्या साहित्याचे वाचन करावे. याशिवाय त्यांच्या विचाराचे मार्गक्रमण करावे. आपल्या देशात विचाराची एक समृद्ध परंपरा असताना आजचा युवक आपल्याला हताश झालेला दिसतो. वर्तमान परिस्थितीत सर्व समस्यांचे उत्तर शोधायचे झाल्यास प्रत्येकाने विवेकानंदाच्या साहित्याचे वाचन करायला हवे असे तुरकर म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शामराव कोरेटी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कुठल्याही परिस्थितीला न घाबरता येणाऱ्या समस्येला समोर जावे आणि योग्य मार्ग क्रमण करावे, असे सांगितले. प्रत्येकाच्या जीवनाचा तारुण्य हा महत्त्वाचा आणि सुंदर कालखंड असतो. युवकांनी याच कालखंडात स्वतःला सावरून नियंत्रित ठेवून योग्य कार्य केले तर भविष्य उज्वल होऊ शकते. आणि देशाच्या प्रगतीस हातभार लागू शकतो, असे डॉ. कोरेटी म्हणाले. युवक हेच देश बदलण्याची क्षमता ठेवतात. अशा अनेक बाबींचा उलगडा युवा दिन निमित्त त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केला.
कार्यक्रमाचे संचालन इतिहास विभागातील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आकांक्षा बनसोड हिने केले तर मुख्य प्रमुख वक्त्याचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रदीप चव्हाण यांनी केले आभार एम ए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आचल साळवे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागातील डॉ रामभाऊ कोरेकर, डॉ लक्ष्मण गोरे सह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.