भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयात ‘युनिसस्टेन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

शाश्वततेद्वारे उच्च शिक्षणात परिवर्तनाचे धाडसी पाऊल : कुलगुरू डॉ. विवेक सावजी

पुणे, दि. २२ सप्टेंबर २०२५ : “शाश्वततेद्वारे उच्च शिक्षणात परिवर्तन घडविणे हे केवळ नियमांचे पालन नाही, तर ही समाजाच्या विचारसरणीत बदल घडविणारी प्रक्रिया आहे,” असे प्रतिपादन भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी केले.

विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील पर्यावरण शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयात ‘युनिसस्टेन २०२५’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन डॉ. सावजी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्राचार्या डॉ. शमिता कुमार, आयक्यूएसीच्या संचालिका डॉ. कीर्ती गुप्ता, क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्टचे संचालक आदित्य पुंडीर, तसेच रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा सौ. स्वप्नाली विश्वजीत कदम आभासी पद्धतीने उपस्थित होत्या.

डॉ. सावजी म्हणाले, “गेल्या ६० वर्षांपासून भारती विद्यापीठाने पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. बदलत्या शैक्षणिक मूल्यांवर आधारित शाश्वततेसाठी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्माण करणे हा उपक्रम त्या परंपरेचा विस्तार आहे.”

आदित्य पुंडीर यांनी उच्च शिक्षण संस्थांच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकू शकतात, हवामान बदलावर उपाय शोधू शकतात आणि समाजाला जोडू शकतात. भारती विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कार्यातून हे दाखवून दिले आहे.”

सौ. स्वप्नाली कदम यांनी म्हटले, “समाजासाठी सक्षम आणि शाश्वत शिक्षण देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. ‘युनिसस्टेन २०२५’ उपक्रम विद्यापीठात प्रभावीपणे राबवला जाईल याची खात्री आहे.”

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात इस्रायलमधील बेन-गुरियन विद्यापीठाचे प्रा. डॅन ब्लूमबर्ग यांनी नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि जलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानासाठी उपाय कसे साधता येतात याचे मार्गदर्शन केले. कोलोन विद्यापीठातील प्रा. किर्क युंकर आणि डॉ. पामेला किलियन यांनी २०१९ पासून प्रति विद्यार्थी कार्बन उत्सर्जन ४० टक्क्यांनी कमी करण्याचा अनुभव मांडला.

आयक्यूएसीच्या संचालिका डॉ. कीर्ती गुप्ता यांनी शाश्वतता रँकिंग, ईएसजी (Environmental, Social, Governance) आणि एसडीजी (Sustainable Development Goals) यावरील मेट्रिक्सची माहिती देत विद्यापीठांचे मूल्यमापन कसे केले जाते, हे स्पष्ट केले.

हा उपक्रम उच्च शिक्षणात स्थानिक नाविन्याला चालना देत जागतिक शाश्वततेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक धाडसी पाऊल असल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com