राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धांना सुरुवात
सर्वोत्तम खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करा – डॉ योगेश भुते
खेळाची जीवनात महत्त्वाची भूमिका – डॉ राजेंद्र काकडे
नागपूर : खेळाची जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम रवी नगर येथील क्रीडा परिसरात बुधवार, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ काकडे मार्गदर्शन करीत होते. स्पर्धेचे उद्घाटन करताना सर्वोत्तम खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ योगेश भुते यांनी सहभागी विद्यार्थ्यांना केले.
उद्घाटनीय सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ योगेश भुते तर विशेष अतिथी म्हणून वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, अधिसभा सदस्य डॉ संजय चौधरी, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मैदानी स्पर्धेमध्ये ३७ खेळ प्रकारात संलग्नित महाविद्यालयातील तब्बल ३ हजार सहभागी विद्यार्थी खेळ भावनेने खेळतील, असे प्र-कुलगुरु डॉ काकडे पुढे बोलताना म्हणाले.
महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना स्पर्धेमध्ये स्वतःला आपण प्रस्तुत करीत आहे. दैदिप्यमान कामगिरी करीत महाविद्यालय व विद्यापीठाचे नाव उंचवावे असे ते म्हणाले. आपल्या मधीलच काही खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होत सुवर्णपदक प्राप्त केले आहे, ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब असल्याचे डॉ काकडे म्हणाले. अधिकाधिक विद्यार्थ्यांना मैदानावर आणणे काळाची गरज असल्याचे सांगत विद्यापीठाच्या वतीने खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत सहभागी सर्व खेळाडूंना डॉ काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे उद्घाटन करताना विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ योगेश भुते यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाप्रती जागरूकता तसेच कौशल्य निर्माण व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचे सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १०.६ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब प्रमाणपत्र प्राप्त असा सिंथेटिक ट्रॅक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या १० सिंथेटिक ट्रॅकमध्ये विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचा समावेश आहे.
या सिंथेटिक ट्रॅक वर खेळण्याची सराव करण्याची सुवर्णसंधी आपणास प्राप्त झाली असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन डॉ भुते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. सर्व विद्यार्थी खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त करीत मागील सत्रातील उत्कृष्ट प्रदर्शनाबाबत अहवाल वाचन केले.
रवी नगर येथील क्रीडा परिसरात ४ ते ७ डिसेंबर २०२४ दरम्यान आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धेत विद्यापीठ संचालित तसेच संलग्नित महाविद्यालयातील तब्बल ३ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत. उद्घाटनिय कार्यक्रमाला क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे जेष्ठ सदस्य डॉ धनंजय वेळुकर, पदव्युत्तर क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ माधवी मार्डीकर, डॉ विवेकानंद सिंह, डॉ नितीन जांगिटवार, सदस्य धनश्री लेकुरवाळे, डॉ आदित्य सोनी, डॉ विजय दातारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त खेळाडू आदर्श भुरे, सौरभ तिवारी, तेजस्विनी लांबकाने व आशुतोष बावणे यांनी आणलेली क्रीडा ज्योत प्रमुख अतिथींनी प्रज्वलित केली. त्यानंतर नेहा डबाले व नयन सरोदे यांनी उपस्थित खेळाडूंना प्रतिज्ञा दिली. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन डॉ आदित्य सोनी यांनी केले तर आभार डॉ संजय चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारणी सदस्य, विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.