एसएफआयचे ४३ वे बीड जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून लहू खारगे तर जिल्हा सचिव म्हणून विष्णू गवळी यांची निवड

बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे ४३ वे बीड जिल्हा अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. दिनांक २६-२७ फेब्रुवारी २०२४ रोजी मानवी हक्क कार्यालय, तेलगाव येथे हे दोन दिवशीय अधिवेशन भरवण्यात आले होते. अधिवेशनाची सुरुवात एसएफआयचे ध्वज फडकावून आणि शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून करण्यात आली. अधिवेशनाच्या मंचाला सत्यशोधक विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते अमोल खरात मंच, सभागृहाला कम्युनिस्ट शेतमजूर नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे तर परिसराला शेतकरी नेते कॉम्रेड शंकरराव दानव नगर असे नाव दिले गेले होते.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी कार्यकर्ते-नेते प्रा. डॉ. प्रशांत तौर यांनी केले. अधिवेशनास राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव, माजी राज्य अध्यक्ष व डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच माजी जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे व राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, अतुल बिडवे यांनी अधिवेशनास आणि नवीन जिल्हा कमिटीला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष लहू खारगे हे होते; तर सूत्रसंचालन विष्णू गवळी यांनी केले.

उद्घाटनपर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. तौर म्हटले की, ‘एसएफआय ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असणारी एकमेव विद्यार्थी संघटना आहे. एसएफआय कुणाची गुलामगिरी शिकवत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेत व्यवस्थित नियोजन करत लढा उभा करते. त्यातून नक्कीच प्रश्न सुटतात. यासाठी मजबूत संघटन उभा करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांना केले.’

पुढे ते म्हणाले की, ‘आज देशात शैक्षणिक वर्तुळात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न गंभीर बनत आहेत. ते प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. परंतु त्यासाठी एसएफआयच संघर्ष करू शकते. एसएफआय विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊ शकते. त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा देते. म्हणून एसएफआयमध्ये विद्यार्थ्यांच्या हजारो जनसमुदायाला सामील करून घेण्याची जबाबदारी विद्यार्थी कार्यकर्त्यांवर आहे. ती एसएफआय पार पाडेल.’ अशी अपेक्षा प्रा. डॉ. तौर यांनी व्यक्त केली.

Advertisement

त्यानंतर अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात लहू खारगे यांनी ‘एसएफआयच्या मागील कार्याचा, जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल’ मांडला. तसेच अधिवेशनात पुढील ठराव घेण्यात आले. (१) जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देण्याचा व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा. (२) ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यासाठी घोषित केलेले वसतीगृह तात्काळ सुरू करा. (३) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. (४) विद्यार्थिनी व महीला अत्याचार विरोधात लढा तीव्र करा. (५) ग्रामीण भागातील बस व्यवस्था सुरळीत करा व विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्या. (६) महागाईनुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ करा (७) आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढा तीव्र करा. (८) मागेल त्या विद्यार्थ्याला वसतीगृह मिळावे यासाठी लढा तीव्र करा. (९) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र लढा उभा करा. यासहीत विविध ठराव यामध्ये एकमताने पारित करण्यात आले. त्यानंतर अहवाल आणि ठरावावर प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते अहवाल आणि ठराव पास करण्यात आले.

अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळाचे कामकाज लहू खारगे, अंकुश कोकाटे, शिवा चव्हाण यांनी तर संचालन कमिटीचे कामकाज विष्णू गवळी व आदित्य कासारे यांनी केले. मिनिट्स कमिटीचे कामकाज अक्षय वाघमारे व पल्लवी कासारे; तर रजिस्ट्रेशन कमिटीचे कामकाज पवन चिंचाणे, हर्षद डाके यांनी पाहिले. अधिवेशन दरम्यान संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आली. यात प्रतिनिधींनी वेगवेगळे क्रांतिकारी गीतांचे सादरीकरण केले, तसेच पथनाट्य सादर केली. त्यासोबतच ‘एसएफआयचा कार्यकर्ता कसा असावा?’, ‘एसएफआयची कार्यपद्धती ‘, ‘आजचे शैक्षणिक प्रश्न आणि त्यासाठी संघर्ष’, या विषयांवर विशेष सत्र घेण्यात आले. त्यात अनुक्रमे मोहन जाधव, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव यांनी मार्गदर्शन केले.

या अधिवेशनात २१ सदस्यांची एसएफआयची नवीन बीड जिल्हा कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून लहू खारगे तर जिल्हा सचिव म्हणून विष्णू गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अंकुश कोकाटे, शिवा चव्हाण तर सहसचिव म्हणून आदित्य कासारे, पवन चिंचाने यांची निवड झाली आहे.
जिल्हा कमिटीमध्ये सदस्य म्हणून संतोष जाधव, ज्योतिराम कलेढोण, अक्षय वाघमारे, रमेश नाईकवाडे, आनंद सक्राते, आरती साठे, शेख मेहदी हसन, हर्षद डाके, पल्लवी कासारे, रामेश्वर राठोड,अब्राल शेख, करण साळवे, अभिषेक अडागळे यांची निवड करण्यात आली आहे. एसएफआयच्या नवनिर्वाचित बीड जिल्हा कमिटीचे नेतृत्व व सर्व नव्याने निवड झालेल्या सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. एसएफआयच्या अधिवेशनाचा समारोप ‘हम होंगे कामयाब’ या स्फूर्तीदायी गीताने करण्यात आला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अनिल राठोड, रामेश्वर जाधव, अशोक नागरगोजे, आकाश कचरे, स्वप्नील तेलप, ज्ञानेश्वर शिंदे, संकल्प साठे, सूरज कदम, गंगा माने, करण भिसे, यशवंत सक्राते, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page