गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थीभिमुख योजना व उपक्रम

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच विद्यापीठाचे ध्येय

गडचिरोली : नक्षलग्रस्त, ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने गोंडवाना विद्यापीठाची 27 सप्टेंबर, 2011 रोजी स्थापना केली. स्थापनेपासूनच अध्ययन, अध्यापक आणि संशोधन या तीनही क्षेत्रामध्ये विद्यापीठ नवनवीन संकल्पनांची व उपक्रमांची प्रत्यक्षात अमंलबजावणी करीत आहे. आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ प्रयत्नशील असून विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच विद्यापीठाचे ध्येय आहे.

Gondwana University GUG Gadchiroli

गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच विद्यार्थी विकास विभाग कार्यान्वीत आहे. विद्यापीठाच्या महत्वपुर्ण अशा समाजनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, शीलसंवर्धन, समता, समाजसेवा या उद्दीष्टपुर्तीच्या बाबतीत प्रचलीत शिक्षण पद्धतीद्वारा शैक्षणिक उपक्रमाबरोबरच शिक्षणेत्तर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागींण विकास करता यावा या उदात्त हेतूने विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारा विविध उपक्रमाचे आयोजन तसेच विद्यार्थी हितार्थ व कल्याणार्थ योजना राबविल्या जातात.

विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या संस्कारक्षम व कल्याणकारी योजना राबविणे तसेच आवश्यकतेनुसार नवीन योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी विद्यार्थी विकास विभाग कार्य करीत आहे.

विद्यार्थी विकास विभागाच्या कामकाजाची वैशिष्टये :

विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी उपक्रमाचे विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावर आयोजन करणे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणे. याकरीता आंतर महाविद्यालयीन व गरज भासल्यास विभागीय स्तरावर सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम संलग्नित महाविद्यालयांमध्ये राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व महाविद्यालयांना सहकार्य करणे. विद्यार्थ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक व वांग्मयीन व्यासंग वाढविण्याकरीता प्रयत्न करणे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती महाविद्यालयांना देणे व मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार विविध निधीमधून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हि विद्यार्थी विकास विभागाच्या कामकाजाची वैशिष्टये आहेत.

महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी कल्याणार्थ योजना कार्यान्वित करण्यासाठी, कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक विद्यापीठ कायद्यानुसार, विद्यार्थी विकास मंडळाची रचना केलेली असते. सदर मंडळ महाविद्यालयामध्ये वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवून कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन सुव्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही यावर लक्ष केंद्रित करून मार्गदर्शक सूचना देखील करीत असते.
विद्यार्थी विकास मंडळाने घेतलेल्या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणी करिता महाविद्यालय एका कर्तव्यदक्ष सहाय्यक तथा सहयोगी प्राध्यापकांची विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करीत असते. सदर विद्यार्थी विकास अधिकारी, विद्यार्थी कल्याणार्थ उपक्रम राबविणे, विद्यार्थी परिषद व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने संबंधित कार्य सांभाळणे तसेच दैनंदिन कामकाज पाहण्याकरीता प्राचार्य नामनिर्देशनाने नियुक्ती करीत असतात.

विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना :

कमवा आणि शिका योजना :

Advertisement

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, मानवी श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, ज्ञानसेवक बनविणे, श्रमसंस्कृतीची जाणीव निर्माण करणे आणि विविध प्रकारची कामे करून मिळणाऱ्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे हे या योजनेची उद्दिष्टे आहे.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजना:
गोंडवाना विद्यापीठाच्या दशमानोत्सवानिमित्त हि योजना सुरू करण्यात आली आहे. आदिवासींचे परंपरागत ज्ञान व संस्कृतीवर आधारित उपजीविकेचे साधन नवसंकल्पना म्हणून रुजवितांना मिळणाऱ्या कार्यानुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना सदर योजनेद्वारे मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

व्यक्तिमत्व विकास योजना :

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, जीवनमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करणे तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आरोग्य, कायदे, संस्कृती, संगणक, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास अशा कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करणे. शिक्षणेत्तर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण योजना :

विद्यार्थ्यांना आपत्तीचे आकलन करून देणे. आपत्ती टाळण्यासाठी विविध स्त्रोतांची माहिती करून देणे. आपत्तींना सामोरे जाण्याची तयारी करून घेणे. आपत्तीनंतर बचाव कार्य, मदतकार्य वेगाने व सूत्रबद्ध पद्धतीने करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, याकरीता तज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. आपत्ती व्यवस्थापनातून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे. आपत्ती येण्यापूर्वी पूर्वतयारीबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. महाविद्यालयीन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापित करणे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची व नियमांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे. विद्यार्थ्यांना आपत्तीप्रसंगी स्वयंसेवक म्हणून स्फूर्तीने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनास योग्य ते सहकार्य करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

विद्यार्थी आर्थिक सहायता निधी :

गरीब, गरजू पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बस पास सवलत खर्च, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वस्तीगृहातील राहण्याचा व जेवणाचा खर्च, पुस्तकांचा व इतर शैक्षणिक साहित्याची खरेदी यासाठी व तत्सम इतर शैक्षणिक खर्चासाठी नियमावलीनुसार आर्थिक सहाय्य केल्या जाते. विद्यापीठाद्वारे गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांसाठी सदर निधीतून तरतूद करण्यात येते. त्याचप्रमाणे, विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधीतून वैद्यकीय मदत केली जाते.

युवक महोत्सव :

विद्यार्थी विकास विभागाद्वारे सर्व संलग्न महाविद्यालयातील तसेच विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतीक स्पर्धांचे आयोजन करून प्रोत्साहित केले जाते. तसेच विविध सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ संघामध्ये सहभागी होण्याकरिता पाठविण्यात येते. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यास मदत होत आहे.

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ/आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव : (इंद्रधनुष्य) :

शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्यसंगीत, सुगमसंगीत, पश्चिमात्य गायन, भारतीय व पश्चिमात्य समूहगान, लोकसंगीत वाद्यवृंद, लोक व आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, साहित्यिक कलाप्रकारात प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रंगमंच कलाप्रकारात एकांकिका, मुकनाट्य, नकल आणि ललित कलाप्रकारात स्थळचित्र, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी आदी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले जाते.

आविष्कार संशोधन महोत्सव :

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांच्या संशोधन प्रकल्पाला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता आविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आविष्कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याकरीता विद्यार्थी विकास विभाग प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page