एमजीएम विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सामंजस्य करार

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या दोन विद्यापीठांमध्ये शैक्षणिक विषयासंदर्भात मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी कुलगुरू डॉ विलास सपकाळ आणि कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, एमजीएम हिल्सचे संचालक डॉ के ए धापके, उपकुलसचिव डॉ परमिंदर कौर धिंग्रा, प्राचार्य डॉ एन एम मस्के, प्राचार्य डॉ एन आर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत येरूळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, कुलसचिव व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ सपकाळ म्हणाले, एमजीएम विद्यापीठ कायम विविध संस्था, विद्यापीठे यांच्याशी सामंजस्य करार करीत आले आहे. या अगोदर अनेक संस्थांशी आम्ही अशा प्रकारचे करार केले असून हा पहिल्यांदाच एका सार्वजनिक राज्य विद्यापीठासमवेत आम्ही करारबद्ध होत आहोत. विशेषत: एखाद्या कृषि विद्यापीठासोबत केलेला हा पहिलाच करार आहे. आज हा करार करीत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा एक भाग म्हणून या सामंजस्य कराराकडे पाहिले पाहिजे. शैक्षणिक विषयांना अनुसरून हा आजचा करार करण्यात आलेला आहे. भारतीय शिक्षणाला जगामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे. एमजीएम आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची निर्मिती होते. येत्या काळामध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, तंत्रज्ञानाधारीत अभ्यासक्रम, कृषि अभ्यासक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन अशा प्रकारचे अभ्यासक्रम या कराराच्या माध्यमातून राबविले जातील असे कुलगुरू डॉ सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ सपकाळ म्हणाले, सामंजस्य कराराच्या माध्यमाधून आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अभ्यासक्रम निर्माण करून ते विद्यापीठात राबविणे हा एक या सामंजस्य कराराचा महत्वपूर्ण उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधन आदींचे हस्तांतरण या सामंजस्य कराराच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन संशोधनास या माध्यमातून चालना मिळणार आहे.

Advertisement

एमजीएम आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आता एकत्रितपणे संशोधन करणार असून दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयामध्ये अनुभवाधारीत शिक्षण शिकण्याची संधी या सामंजस्य कराराच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. तसेच प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप्स यासाठी या सामंजस्य कराराचा फायदा होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी यावेळी दिली.

कुलगुरू डॉ इंद्र मणी पुढे बोलताना म्हणाले, मी एमजीएम विद्यापीठास भेट दिल्यानंतर तिथे मला अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पहावयास मिळाले. आज दोन महत्वपूर्ण संस्था या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकत्रित येत एका नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात करीत आहेत. क्षेत्रनिहाय तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना आता संशोधन करणे सोयीचे होणार आहे. तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतांना आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना न्याय देण्यासाठी वाव मिळणार आहे. विशेषत: येत्या काळामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षण मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील, असा विश्वास मला वाटतो.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या दोन विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक गतीने कृषि क्षेत्राशी निगडीत संशोधन करता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन, नाविन्यता यासाठी फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतांना आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना न्याय देण्यासाठी वाव मिळणार आहे. एमजीएम विद्यापीठ विविध क्षेत्रातील संस्थांशी सामंजस्य करार करून विद्यार्थी हिताचे वेगगेगळे उपक्रम राबवित आले आहे. या कराराचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा होईल, असा विश्वास कुलपती अंकुशराव कदम यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करार झाल्यानंतर एमजीएम विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, गुळ, ऊसाचा रस आणि मसाले प्रक्रिया केंद्र, गृहविज्ञान महाविद्यालय, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळा, कृषि महाविद्यालय, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स आदि ठिकाणी भेट देऊन सविस्तरपणे माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page