राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त

वर्ल्ड ॲथलेटिक्सने दिले प्रमाणपत्र


नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स संघटनेचे सीईओ जाॅन रिडगाॅन यांनी सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय वर्ग २ ॲथलेटिक्स सुविधायुक्त ट्रॅकचा दर्जा प्राप्त प्रमाणपत्र दिले आहे. रवी नगर चौक स्थित क्रीडा परिसरात अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाला सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात यश आले आहे. शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील क्रीडा संकुल परिसरात अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे, प्रेक्षक गॅलरी दुरुस्ती करण्यात आले आहे. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक समिती सदस्य डॉ. धनंजय वेळूकर, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे बॅक्टिस डिसूझा, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. शरद सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपविभागीय अभियंता अतुल गोटे, सहाय्यक अभियंता वर्षा घुसे, प्रवीण मोरे, कनिष्ठ अभियंता आकाश पगारे, विद्यापीठ अभियंता डॉ पल्लवी गिरी तसेच विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता शेषराव ताजणे यांचे सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात मोलाचे योगदान लाभले आहे.

Advertisement
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University synthetic track gets international status


विद्यापीठाच्या या सिंथेटिक ट्रॅकवर ४०० मीटरच्या एकूण आठ लेन आहेत. ट्रॅक्टवर पूर्व दिशेला गोळा फेक आणि भालाफेक तर पश्चिम दिशेला स्पर्धेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण दिशेला दोन ठिकाणी लांब उडी व तिहेरी उडीसाठी जम्पिंग पीटची व्यवस्था आहे. ट्रॅकवर ट्रिपल चेस प्रकारासाठी विशेष सुविधा आहे. ट्रॅक खराब होण्यापासून रोखण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम व्यवस्था ही आहे. ट्रॅकवर खेळाडू व तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रॅकच्या आत कोणीही प्रवेश करू नये, यासाठी सभोवताल तारेची कुंपण टाकण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वी सरावासाठी मैदानाच्या पूर्व व पश्चिम दिशेला विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मैदानावर दिवस- रात्रीचे सामने खेळता येणार आहे. राज्य क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला प्रमाणित सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या सिंथेटिक ट्रॅक वर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करता येणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University synthetic track gets international status

ॲथलेटिक संघटनेकडून कुलगुरूंचा सत्कार

विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय वर्ग २ ॲथलेटिक्स सुविधायुक्त ट्रॅकचा दर्जा प्राप्त झाल्याने नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुदेव नगराळे, सभापती उमेश नायडू यांच्या हस्ते कुलगुरूंना प्रमाणपत्राची प्रतिकृती व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे वरिष्ठ संयुक्त सचिव रामचंद्र वाणी, संयुक्त सचिव अर्चना कोट्टेवार, कोषाध्यक्ष डॉ. संजय चौधरी, तांत्रिक पंच विनोद पाचघरे, प्रशिक्षक गौरव मिरासे, अंकित भडके, मनोज पुडके, दिशांत वालदे, सायली वाघमारे, गणेश वाणी, नितीन धाबेकर, मोहित सहारे अश्विनी नागुलवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page