संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मजबूत लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करावी – जिल्हाधिकारी

विद्यापीठात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मतदान जनजागृती व समता रॅलीचे आयोजन

अमरावती : लोकशाही मजबूत व सशक्त होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कर्तव्य समजून मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी फस्ट टाईम व्होटर असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती समाजामध्ये व आपल्या परिसरात आणि शहरात करावी, असे आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. विद्यापीठात डॉ आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, माजी व्य प सदस्य डॉ प्रफुल्ल गवई, डॉ आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ संतोष बनसोड उपस्थित होते.

सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम विद्यापीठात राबविण्यात आले आहेत. मतदान जनजागृती कार्यक्रम या निमित्ताने राबविण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. आज मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावण्याची गरज आहे. त्यासाठी नवयुवक भारताचे भविष्य घडविणा-या विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, त्यांनी केलेल्या जागृतीचा मोठा प्रभाव नागरिकांवर पडतो. सर्व शिक्षित विद्यार्थ्यांनी जागरुक नागरिक बनून बाबासाहेबांच्या विचारानुसार व संविधानानुसार देश विकासामध्ये योगदान द्यावे असे सांगून जयंतीनिमित्त व मतदान रॅलीला त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

Advertisement

मतदान प्रथम कर्तव्य – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

मतदान करणे हे सर्व भारतीय नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे व मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवावा. लोकशाहीचा उत्सव सध्या सुरू असून या उत्सवात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. संविधान आणि लोकशाही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिकलेली व्यक्ती मतदानाला जात नाही, अशी ओरड असते. त्यामुळे सुशिक्षितांनी स्वत: पुढे येऊन मतदान करावे, याशिवाय जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करावी, विद्यार्थ्यांनी आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, परिचितांमध्ये सांगावे, असे सांगून त्यांनी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी मान्यवरांचे शॉल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. संचालन डॉ अभिजित इंगळे यांनी, तर आभार डॉ रत्नशील खोब्राागडे यांनी मानलेत.

विद्यापीठ परिसरातून मतदान जनजागृती व समता रॅलीचे भव्य आयोजन
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मतदान जनजागृती व समता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार व कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या शुभहस्ते रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, भारतीय महाविद्यालय, पी आर पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय व प्रो राम मेघे अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे रा से यो विद्यार्थी पथक तसेच विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page