डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

बाबासाहेबांनी दाखवली अंतर्बाह्य उजेडवाट – अभ्यासक डॉ अरविंद गायकवाड

 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, मिरवणूक जल्लोषात

छत्रपती संभाजीनगर : हजारो वर्षे अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तीची उजेडवाट दाखवली. तसेच संविधानाच्या माध्यमातून देशाच्या परिवर्तनाची दिशा प्रकाशमान केली, असे प्रतिपादन अभ्यासक डॉ अरविंद गायकवाड यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीत रजनी, मिरवणूक, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठ नाटयगृहात रविवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, व्यस्थापन परिषद सदस्य डॉ अंकुश कदम व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ सुरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती मंचावर होती.

यावेळी डॉ अरविंद गायकवाड (विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पीटल) यांचे ’राष्ट्रनिर्माते : डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण विश्वातील १५२ देशात साजरी होत आहे. भारतात तर हजारो पिढया वंचित राहिलेल्या घटकांसाठी हा क्रांती दिन आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे या देशाच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाचे आहे, ज्याला आजही तोड नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे गुरू मानले त्यात एका समान गोष्टीचा धागा आहे. तो म्हणजेया महापुरुषांची समाजाप्रती असलेली वैचारिक बांधिलकी . बाबासाहेब नेहमी म्हणत की आपण प्रथमतः आणि शेवटी देखील भारतीयच आहोत. भारतीय असण्याची बाबासाहेबांची संकल्पना आजच्या तरुणांनी स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. ब

बासाहेबांनी संविधान निर्मितीचे कार्य तर केलेच. सोबतच भारताचे ऊर्जा धोरण, विद्युत धोरण, जल धोरण देखील ठरविले. सर्वसामान्य स्त्रिया, कष्टकरी, मजूर, कामगार तसेच देशातील सगळ्यांचे हित व्हावे यासाठी झटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरेखुरे राष्ट्रनिर्माते आहेत. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील काम आजच्या तरुणांनी अभ्यासणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथात रुपयाचे मूल्य कसे असावे सांगितले. आर्थिक क्षेत्रात भारत जी काही प्रगती करत आहे, त्याच्या पाठीमागे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थिक विचार आहेत. कारण जगातले त्या काळातले सर्वात तज्ञ अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांची ओळख होती. आणि आजही आहे. जगातले जे काही सुंदर आहे ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला दिले आहे. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अग्रस्थानी मानतो. तसेच शिवराय फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारून देशाची वाटचाल करावी लागणार आहे. असे देखील मत त्यांनी मांडले.

Advertisement

फुले शाहू डॉ.आंबेडकरांचा वैचारिक वसा जपा : कुलगुरु डॉ विजय फुलारी

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ विजय फुलारी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कोणत्याही एका जातीसमूहाचे उद्धारकर्ते नव्हते. तर ते संपूर्ण भारतीयांचे उद्धारकर्ते होते. भारतीय संविधानात सर्वांना समानतेचा अधिकार देऊन त्यांनी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनवीले. युवकांनी बाबासाहेबांचा विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्याच्या काळात सर्वांना तारून नेणारे विचार असणारे फुले – शाहू – डॉ आंबेडकर यांचा वैचारिक वसा आणि वारसा नेटाने पुढे नेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविक केले. गेल्या आठवड्यात या निमित्ताने वाचन सप्ताह, ग्रंथोत्सव, भिमोत्सव व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. धम्मपाल जाधव याने सूत्रसंचालन तर डॉ कैलास अंभुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ अपर्णा पाटील, डॉ योगिता पाटील, डॉ भगवान साखळे, डॉ संजय साळुंखे, डॉ महेंद्र शिरसाठ, डॉ स्मिता गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली. व्याख्यानासाठी नाटयगृह खचाखच भरले होते.

भिमोत्सावातील पारितोषिक वितरण, मतदारांना शपथ

यावेळी भीम उत्सवात आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. वादविवाद, वकृत्व, काव्यवाचन, क्रिकेट, रांगोळी, नृत्य तसेच भीम गीतगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संस्थापक डॉ प्रकाश इंगळे व अध्यक्ष मंगेश गवई यांच्यासह सहकाऱ्यांनी या स्पर्धांचे आयोजन केले. देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. त्या अनुषंगाने रासेयो व संचालक डॉ सोनाली क्षीरसागर यांनी सभागृहातील उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

मिरवणूक जल्लोषात

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यापीठ प्रवेशद्वार ते नाटयगृहातपर्यत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठ गेट पासून निघालेल्या या मिरवणुकीस कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरुवात केली. रॅलीत पाहुणे डॉ अरविंद गायकवाड, प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, जयंती समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ सुरेश गायकवाड, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे, डॉ अंकुश कदम यांच्यासह अधिकार मंडळांचे सदस्य सहभागी झाले. सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास कुलगुरू व पाहुण्यांनी पुष्पहार अर्पण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page