उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान संपन्न
जळगाव : प्राचीन काळापासून स्त्रियांना पितृसत्ता आणि धर्मसत्तेच्या द्वारे दुय्यम दर्जा देण्यात आला. भारतातील अनेक समाज सुधारक यांच्या लढयामुळे स्त्री, ही पुरुषी बंधनात अडकलेली होती. भारतीय संविधान आणि हिंदु कोड बिल यातील स्त्री मुक्ती विषयक तरतुदीमुळे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. म्हणून स्त्रियांनी सर्वांगीण विकासासाठी संविधानिक स्त्री स्वातंत्र्य विषयक तरतुदी विषयी जागरूक रहावे असे प्रतिपादन डॉ सुकेशनी थोरात यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने ‘भारतीय संविधानातील स्त्री स्वातंत्र्य विषयक तरतुदी’ या विषयावर विशेष व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ राकेश रामटेके हे होते. तर डॉ विजय घोरपडे, डॉ कविता पाटील, डॉ अभय मनसेरे, डॉ बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा सावंत सर, प्रा पालखे मॅडम, प्रा विनेश पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा डॉ रामटेके यांनी महिला मुक्तीसाठी अशा व्याख्यानाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुकन्या जाधव हिने स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा योगेश माळी यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ विजय घोरपडे यांनी केले. डॉ अभय मनसरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.