मुक्त विद्यापीठाच्या ‘तुम्हीच व्हा ! संपादक हस्तलिखित अंक’ स्पर्धेचे अंतिम निकाल जाहिर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘तुम्हीच व्हा ! संपादक हस्तलिखित अंक’ स्पर्धेचे अंतिम निकाल जाहिर
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या अध्ययनार्थीसाठी मुक्त विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आणि संवाद पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण स्पर्धा “तुम्हीच व्हा! संपादक हस्तलिखित अंक” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्देश अध्ययनार्थीला विविध साहित्याचा परिचय व्हावा. त्यांनी या साहित्याचे लेखन व संग्रहण करावे आणि आपल्या दैनंदिन उपयोजनात त्यातील काही भाग घेऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी येतात का? याचे विमर्षी चिंतन करावे हा होता.
यामध्ये कथा, कविता, लेख, चरित्र, विनोद, चित्रे, चित्रकथा, प्रवासवर्णन, मनोगत आणि संपादकीय संस्कार मध्ये मुद्रितशोधन, पानाची मांडणी, अंक बांधणी बरोबरच संपादकीय लेखन, श्रेयनामावली, जाहिरात इ. चा अभ्यासपूर्ण अनुभव अध्ययनार्थींनी घेतला आणि आपला प्रत्यक्ष अंक साकार केला. सदर स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – डॉ विनोद पांडुरंग सिनकर, छत्रपती संभाजीनगर,
द्वितीय क्रमांक – रेश्मा प्रकाश पतंगे, हिंगोली,
तृतीय क्रमांक – सुप्रिया संदेश रोकडे, वर्णे, सातारा,
उत्तेजनार्थ – आशिष गुलाबसिंग वसावे, नंदुरबार, स्नेहा सुनिल ढमाळ, फलटण, मीनाक्षी निलेश मोघे, सातारा, अजिंक्य अशोक कदम, सातारा.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड यांनी अभिनंदन केले. तज्ज्ञ परीक्षक म्हणून प्रमोद भडकवाडे आणि डॉ माधुरी खर्जुल यांच्या समितीने मूल्यांकन केले आहे. परितोषिकाची रक्कम एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे व प्रमाणपत्रे टपालाद्वारे पाठवण्यात येतील, अशी माहीती महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा विजयकुमार पाईकराव यांनी दिली.