शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृहासाठी विलो मॅथर कंपनीकडून १३ लाखांचा निधी

कोल्हापूर : लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहामुळे दात्यांच्या कृतज्ञ स्मृती खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींसमवेत आयुष्यभर राहतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. मूळ जर्मन असलेल्या पुणे स्थित विलो मॅथर अँड प्लॅट पंप प्रा लि या कंपनीमार्फत शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती वसतिगृहासाठी १३ लाख २१ हजार १७१ रुपये इतका निधी आज कुलगुरू डॉ शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले, जलसमृद्धी आणि शुद्ध जलपुरवठ्यासाठी कार्यरत विलो मॅथर कंपनीसोबत शिवाजी विद्यापीठाचे जुने ऋणानुबंध आहेत. कंपनीने विद्यापीठाला जल शुद्धीकरण यंत्रांचा पुरवठा केलेला आहे. आता लोकस्मृती वसतिगृहाला दिलेल्या देणगीतून हे बंध अधिक दृढ झाले आहेत. मात्र, ते आता दुतर्फा निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कंपनीला आवश्यकता भासल्यास विद्यापीठ ज्ञानाची देणगी देण्यास सदैव तत्पर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाटवे म्हणाले, शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत संकल्पनांचा विकास करण्याच्या बाबतीत विलो मॅथर कंपनी बांधील आहे. तदअनुषंगिक धोरणे आणि उत्पादने यासाठी आम्ही कार्यरत आहोत. निर्मिती-संगोपन आणि त्यानंतर समाजाशी तिची सांधेजोड या त्रयीवर आधारित कार्यप्रणाली आम्ही विकसित केली आहे. त्यामुळेच आमची संकल्पना अधिक यशस्वी होत जाते. यातूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पूर्णतः दुर्गंधीमुक्त आणि जवळपास पिण्यायोग्य पाणीनिर्मितीचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करू शकलो आहोत. या क्षेत्रामध्ये विद्यापीठासमवेत काम करायला निश्चित आनंद वाटेल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या वाटवे यांनी लोकस्मृती वसतिगृहासाठी मदतनिधीचा धनादेश कुलगुरू डॉ शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ गिरीश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांनी विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कुलसचिव डॉ विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ सार डेळेकर, उपकुलसचिव रणजीत यादव यांच्यासह विलो मॅथर अंड प्लॅट पंप कंपनीचे उपाध्यक्ष (फायनान्स व कंन्ट्रोलिंग) श्रीकांत शिरोडकर, उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) नितीन असाळकर, प्रकल्प विक्री प्रमुख सुधीर जोशी, सहयोगी उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय विक्री) मनोज बाफना, वितरण प्रमुख अनिल केसवानी, विभागीय व्यवस्थापक संजीव कुमार, उपप्रमुख विजयानंद सोनटक्के, मनुष्यबळ व्यवस्थापक संदीप सावंत आदी उपस्थित होते.

लोकस्मृती वसतिगृह संकल्पनेविषयी…

शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page