एमजीएम विद्यापीठात ‘वी द पीपल’ एकांकिका सादर
‘वी द पीपल’ एकांकिकेस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित दहा दिवसीय संगीत व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक १४ मे २०२४ रोजी संपन्न झाल्यानंतर रुक्मिणी सभागृहात दिग्दर्शक प्रवीण तरडे लिखित ‘वी द पीपल’ ही मराठी एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध पात्र साकारली.
यावेळी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राध्यापक, विभागप्रमुख, विद्यार्थी, नागरिक व सर्व सबंधित उपस्थित होते.
‘वी द पीपल’ या एकांकिकेच्या माध्यमातून गुन्हा करून आरोपी न्यायव्यवस्था आणि विविध यंत्रणांचा स्वत:च्या स्वार्थापायी वापर करून त्याचा कशा पद्धतीने दुरुपयोग करतो, हे सांगितले आहे. त्याचप्रमाणे अंतिमतः संबंधित गुन्हेगारास केलेल्या गुन्ह्याबद्दल आणि त्याच्याकडून यंत्रणेचा होत असलेला गैरवापर उघडकीस आणून पोलिस त्याच्यावर कारवाई करतात हे मांडण्यात आले आहे.
‘वी द पीपल’ ही एकांकिका दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील करिअरच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली आहे. एकांकिकेत प्रमुख भूमिका व दिग्दर्शक म्हणून किशोर जाधव व अभिजीत तांगडे यांनी काम केले असून एकांकिकेत त्यांच्यासह अर्पा श्रीसुंदर, संयम देशमाने, विठ्ठल निर्मळ, कुणाल गरुड, मच्छिंद्र तुपे, गौरव निकम यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे एकांकिकेस संगीत भूषण व्यवहारे, नेपथ्य निलेश राजपूत आणि प्रकाश योजनेची बाजू बाबू घडलिंगे यांनी सांभाळलेली होती.तसेच रंगमंच व्यवस्थेसाठी प्रा राहुल खरे, प्रा सतीश जोगदंड, वेदांत लोखंडे, विनोद पवार, निवृत्ती तायडे, रामेश्वर छबिले यांनी सहकार्य केले तर डॉ राजू सोनवणे यांचे या प्रयोगासाठी मार्गदर्शन लाभले.