अमरावती विद्यापीठातील सुसज्ज दृकश्राव्य प्रयोगशाळेची कुलगुरूंनी केली पाहणी
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांची प्रयोगशाळेमधील सुविधांबाबत प्रशंसा
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातील सुसज्ज अशा प्रयोगशाळेची कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी पाहणी केली. यावेळी प्रयोगशाळेमधील सुविधा पाहून मुक्तकंठाने त्यांनी प्रशंसा केली. गृहविज्ञान विभागात विविध पदव्युत्तर व पदव्युत्तेतर स्तरावरील एम एस सी इन फुड अँड न्युट्रीशन (अन्न व पोषण), एम एस सी इन कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन (संप्रेषण व विस्तार), एम एस सी इन रिसोर्स मॅनेजमेंट (संसाधन व्यवस्थापन) असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सुसज्ज अशी दृकश्राव्य प्रयोगशाळा आहे. माजी विभाग प्रमुख डॉ मनिषा काळे यांच्या अथक प्रयत्नाने या प्रयोगशाळेची उभारणी झाली.
वातानुकुलित अशा प्रयोगशाळेमध्ये ध्वनिरोधक, 24 तास विद्युत पुरवठा, पर्याप्त प्रकाश व्यवस्था त्याचबरोबर प्रयोगशाळेत संहिता लेखन, सादरीकरण व चित्रीकरणासाठी उत्तम सुविधा आहेत. टेलिप्रॉम्प्टर हे आधुनिक उपकरण भाषणासह व्हीडिओ चित्रीकरणासाठी अतिशय उपयुक्त असून पाठांतर न करता कॅमेराकडे बघून बोलण्यासाठी सदर उपकरण उपयोगी आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमांसाठी आवश्यक असे अद्ययावत इमेज कॅमेरा, कॅमकॉर्डर, मायक्रोफोन, साऊंड मिक्सर, चलचित्रण व ध्वनी नियंत्रणासाठी नियंत्रण कक्ष, चलचित्रण निर्मित व संपादन संगणकाच्या साहाय्याने करता येते. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी विविध माहितीपट तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे नॉन प्रोजेक्टेड पद्धतीत विविध पोस्टर्स, रॉड पपेट, हॅन्ड पपेट, स्ट्रिंग पपेट आणि सामुदायिक शिक्षणासाठी प्रभावी असे नाटक व पथनाट्य देखील तयार केलेले आहेत.
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख अभियंता शशिकांत रोडे, राजेश एंडले, संजय ढाकुलकर, विजय चवरे यांनी विभागाला भेट देऊन प्रयोगशाळा तसेच सेमिनार हॉल व ध्यानधारणा हॉलची पाहणी केली व उपलब्ध साधनांबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी विभागप्रमुख डॉ वैशाली धनविजय यांनी उपकरणांबद्दल माहिती दिली. भविष्यात या आधुनिक प्रयोगशाळेचा उपयोग करून शॉर्ट टर्म क्रेडिट कोर्सेस विभागात सुरु करण्यात येणार असून त्याचा विद्याथ्र्यांना मोठा लाभ मिळेल. यावेळी डॉ संयोगिता देशमुख, डॉ अनुराधा देशमुख, सुमेध वडुरकर, सुमित गेडाम, शिल्पा इंगोले, देवयानी नवले, एतल कामदार, सुमबुल देलानी, अशोक हिरे, वसंत इंगळे, काशीबाई भगतपुरे, विद्यार्थी उपस्थित होते.