देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे खिर्डी येथे ९०० झाडांचे वृक्षारोपण
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत ९०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून खिर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वृक्षारोपण समारंभास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष लावून सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना वृक्षारोपण समारंभाचे उद्घाटक मौजे खिर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर असे म्हणाले की गावच्या विकासासाठी अशाप्रकारे विविध विभागातून मदत मिळाल्यास गावचा विकास जलद गतीने होऊ शकतो. मी स्वतःही राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून काम केलेले असल्याकारणाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व मला चांगले समजले आहे. या ठिकाणी राष्ट्र विकासात योगदान देत असताना विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होत असतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही एक संधी आहे. या संधीचा आपण उपयोग करावा आपल्याला हवे असलेले सर्वतोपरी सहकार्य आमच्या वतीने केले जाईल.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतानां महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर असे म्हणाले की, सद्यकालीन परिस्थितीमध्ये जग हे मोठ्या संकटात सापडले आहे. दिवसेंदिवस तापमानामध्ये वृद्धी होत आहे. जलस्तर खालावत चाललेला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे तरच भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो. देवगिरी महाविद्यालय नेहमीच अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रस्थानी असते.
देवगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रत्येक वर्षी विशेष शिबिराचे आयोजन करत असते. या शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, मतदार जनजागृती, कुपोषण प्रतिबंधात्मक उपाय, परिसर स्वच्छता, विविध विषयांवर प्रबोधन या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मागील काही वर्षे हे विशेष शिबिर मौजे चित्तेगाव या ठिकाणी आयोजित केले जात होते. यावर्षीपासून मौजे खिर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांच्या परवानगीने खिर्डी हे गाव आमचं महाविद्यालय दत्तक घेत आहे.
आपल्या गावातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा आमच्या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा प्रयत्न करेल आणि आज पासून वृक्षारोपणाद्वारे या कार्यास सुरुवात होत आहे. पुढे बोलत असताना प्राचार्य प्रो अशोक तेजनकर असे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वृक्षारोपण बरोबरच या गावच्या पाणी पातळीमध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकारचे बंधारे तसेच जल पुनःर्भरण या संदर्भात काही उपक्रम राबविण्यात येतील. या उपक्रमामध्ये आपल्या गावातील गावकरी व विशेषतः तरुणांनी ही सक्रियपणे सहभागी होऊन आमच्या महाविद्यालयातील स्वयंसेवकांना सहकार्य करावे.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांडव, शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते दत्तूदादा धोत्रे, देवगिरी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने, मुख्याध्यापिका अनुपमा मोतीयळे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ अनंत कनगरे, कार्यक्रमाधिकारी डॉ भाऊसाहेब शिंदे कार्यक्रमाधिकारी सुवर्णा पाटील, रासेयोच्या सल्लागार समिती सदस्य डॉ रंजना चावडा, खिर्डी गावचे ग्रामस्थ, रासेयोचे स्वयंसेवक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ अनंत कनगरे यांनी केले.