डॉ.अविराज कुलदीप यांना स्वच्छता सारथी फेलोशीप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागामधील हंगामी शिक्षक डॉ.अविराज कुलदीप यांना स्वच्छ भारत उन्नत भारत योजनेअंतर्गत भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून स्वच्छता सारथी फेलो पुरस्कार- 2022 (श्रेणी-ब) ने सन्मानित करण्यात आले.  देशभरातील 36 राज्यांमधून 125 फेलोंची निवड करण्यात आली आहे.  या प्रकल्पाअंतर्गत डॉ. कुलदीप हे कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीमधील पाण्याचे प्रदूषण व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर संशोधन करण्यासाठी सेमीकंडक्टर फोटो कॅटलिस्टचा वापर करणार आहेत.

वेस्ट टू वेल्थ मिशन हे पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेच्या (PMSTIAC) नऊ वैज्ञानिक मोहिमांपैकी एक आहे. भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार (PSA) च्या कार्यालयाद्वारे या मिशनचे नेतृत्व केले जाते. मिशनचे उद्दिष्ट कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान ओळखणे, विकसित करणे आणि उपयोजित करणे, ऊर्जा निर्माण करणे, सामग्रीचे पुनर्वापर करणे आणि मूल्यवान संसाधने काढणे हे आहे. स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण करण्याचे वचन देणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील हे मिशन कार्य करते. देशातील कचरा हाताळणी सुव्यवस्थित करण्यासाठी कचरा व्यवस्थापनासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असे आर्थिक मॉडेल तयार करण्यासाठी हे मिशन विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना वापरून स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांना मदत करण्यास तत्पर आहे.

Advertisement

“पंचगंगा” नदी ही महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे, औद्योगिक सांडपाणी विशेषत: रंग (Dye) उद्योगांचे प्रक्रिया केलेले पाणी थेट या नदीत मिसळते. या वर्षी मार्च महिन्यात जलप्रदूषणामुळे हजारो मासे मरण पावले. केवळ जलचरच नव्हे तर मानवालाही या समस्येने ग्रासले आहे. रंगमिश्रणामुळे पाणी इतके दूषित होते की ते पिण्यासाठी अयोग्य होते. या फेलोशीप अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचे प्रदूषण मुख्यत्वे करून पंचगंगा नदी त्याची कारणे व त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय यासाठी सेमीकंडक्टर फोटो कॅटलिस्टचा उपयोग याविषयी कार्य करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत उन्नत भारत मिशन अंतर्गत डॉ. कुलदीप यांनी निवड झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.के.डी.सोनवणे यांनी अभिनंदन केले.  या प्रकल्पासाठी डॉ.के.एम.गरडकर, डॉ.डी.एम.पोरे, डॉ.जी.एस.राशिनकर, डॉ.एस.एन.तायडे, डॉ.आर.एम.माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page