अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा पदवी वितरण समारंभ संपन्न
आजीवन अध्ययन विभागाचे अभ्यासक्रम विद्यार्थी व समाजाशी सुसंगत – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे
अमरावती : आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील अभ्यासक्रम हे विद्यार्थी केंद्रित व समाजाशी सुसंगत असल्यामुळे समाजातील सर्वच घटक या अभ्यासक्रमांना प्रवेशित होऊ शकतो, ही खरोखरच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. विद्यार्थी विकासाबरोबरच समाज विकासाच्यादृष्टीने हा विभाग सतत प्रयत्नरत असतो. यासाठी विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांची नेहमीच विशेष भूमिका दिसून येते. या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण समारंभातून नक्कीच प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित पदवीदान समारंभात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक धोटे, प्रमुख अतिथी म्हणून आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे सदस्य डॉ रवींद्र सरोदे, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ सुभाष गावंडे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.









यावेळी प्र-कुलगुरू डॉ ढोरे यांनी सर्व पदविकांक्षींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
प्राचार्य डॉ दीपक धोटे म्हणाले, आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील अभ्यासक्रम हे काळानुरुप असल्यामुळे सर्वच घटकांना निश्चित फायदा होईल. हे अभ्यासक्रम केवळ विद्यार्थी हिताचेच नसून समाजहिताचे सुद्धा आहेत, त्यामुळे विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास अभ्यासक्रमातून पूर्ण करू शकतो. विभागामध्ये सुरु असलेल्या इंग्रजी संवाद कौशल्य अभ्यासक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. सर्व पदविकांक्षींना पदवी वितरित करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पदवी वितरण समारंभात विभागातील एम ए समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रमाच्या 32, एम ए योगशास्त्रच्या 32, एम ए आजीवन अध्ययन व विस्तारचे 30, एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे 26, पी जी डिप्लोमा नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स अभ्यासक्रमाचे 41, पी जी डिप्लोमा कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश अभ्यासक्रमाचे 22, पी जी डिप्लोमा योग थेरपी अभ्यासक्रमाचे 29 आणि पी जी डिप्लोमा समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रमाच्या 26 अशा एकूण 238 गुणवत्ता यादीत व प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळविलेल्या यशाचा गुणगौरव व्हावा, यासाठी विविध अभ्यासक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता पदवी वितरण समारंभ हा महत्त्वाचा ठरतो. अशा समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला नवीन प्रेरणा मिळते, शिवाय रोजगाराच्या दृष्टीने नवी दिशा मिळण्यासही मदत होते. या दृष्टिकोनातून या पदवी वितरण समारंभाचे आय़ोजन करण्यात आले.
विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी प्रस्ताविकेतून समारंभ आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन डॉ अश्विनी राऊत व प्रा आदित्य पुंड यांनी, तर आभार प्रा वैभव जिसकार यांनी मानले. समारंभाला विभागातील सर्व प्राध्यापक, बहुसंख्य विद्यार्थी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
