नागपूर विद्यापीठाच्या विशाल कॅम्पसमध्ये ८० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला राज्यशास्त्र विभाग

नागपूर : राज्यशास्त्र विभाग हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विशाल कॅम्पसमध्ये स्थित असून विद्यापीठाचा सर्वात जुना आणि पहिला पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहे. मध्य आणि पश्चिम भारतातील विद्यापीठांपैकी कदाचित हा सर्वात जुना पदव्युत्तर शैक्षणिक विभाग असावा. या वर्षी विभाग ८० वर्षांचा वैभवशाली इतिहास साजरा करत असून, विद्यापीठाचेच नव्हे तर समाजाचे आणि राष्ट्राचेही जीवन समृद्ध करणाऱ्या विभागाच्या कार्याची आठवण साजरी करत आहे.

या विभागाचे विद्यार्थी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर विविध प्रशासकीय पदांवरही कार्यरत झाले आहेत. विद्यापीठ, महाविद्यालय आणि शाळांतील शिक्षक, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये हे विद्यार्थी कार्यरत आहेत.

राज्यशास्त्र विभाग दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवतो. विभागाने विभागीय गरजांची जाण ठेवून इंग्रजीबरोबरच मराठी माध्यमातूनही अध्यापनाची सोय केली आहे. पहिल्या सत्रात विभागात १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. ही व्यवस्था विभागीय तसेच राष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. २०२१ साली विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वतंत्र संशोधनाच्या दृष्टीने सर्व पदव्युत्तर विभागांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यशास्त्र विभाग देखील आता एक स्वायत्त विभाग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झाल्यानंतर विभागाने नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे, जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, कौशल्यविकास व रोजगाराभिमुख गरजांची पूर्तता करतो आणि विविध क्षेत्रांतील संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करतो.

विभागात अध्ययन-अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती राबवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना केवळ वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण न देता प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी सर्वेक्षण, अभ्यास दौरे, समुपदेशन कार्यक्रम, आणि इतर सहशैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विभागाच्या दृष्टीने संपूर्ण जग म्हणजे एक प्रयोगशाळा आहे, जिथे विषयाचे ज्ञान प्रत्यक्षात उतरवले जाते.

राज्यशास्त्रातील पारंपरिक विषयांबरोबरच ‘निवडणूक व धोरण अभ्यास’ हा एक उदयोन्मुख आणि व्यावहारिक विषय म्हणून विभाग विकसित करत आहे. यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याचा विभागाचा मानस आहे. परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा अभ्यास या क्षेत्रांवरही विशेष लक्ष असून, आंतरराष्ट्रीय संबंधांचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. या अभ्यासांचे संस्थात्मक रूप देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यशास्त्र विभाग हा केवळ प्रशासनामुळे नव्हे, तर त्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे घडलेला आहे. विभागात प्रो अशीर्वाथम, प्रो. भास्कर भोळे, प्रो. पी. एल. जोशी, डॉ. जे. व्ही. गवई, डॉ. एम. काशिकर यांसारख्या नामवंत शिक्षकांनी योगदान दिले आहे. सध्या डॉ विकास जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली विभाग कार्यरत आहे. विभागात आज तरुण, प्रेरित आणि समर्पित शिक्षक कार्यरत आहेत जे विभागाच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मेहनत करत आहेत.

खरे तर विभागाची खरी ताकद म्हणजे येथे शिकणारे विद्यार्थी. हे विद्यार्थी विभागातील शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. हे विद्यार्थी केवळ विभागाचे सदस्य नसून विभागाचे आणि विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत, जे समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. समाजात बदल घडवण्याची इच्छा बाळगून नवीन प्रवेश सत्रात सहभागी होत आहेत. अश्या सर्व नव्या विद्यार्थ्यांचे राज्यशास्त्र विभाग स्वागत करते. त्यांना एक अद्वितीय शैक्षणिक अनुभव मिळो, हीच शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com