भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २९ वा स्थापना दिन समारंभ उत्साहात संपन्न

‘कायदेविषयक साक्षरता’ ही काळाची गरज – गोपाल गौडा

पुणे : लोकशाहीची जपणूक राज्यघटनेच्या मुलभूत तत्वानुसार होत राहावी यासाठी सजग, जागरुक नागरिक निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कायदेविषयक साक्षरता ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गोपाल गौडा यांनी केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २९ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ विवेक सावजी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ अस्मिता जगताप,  कुलसचिव जी जयकुमार, माजी कुलगुरू एम जी ताकवले उपस्थित होते. या प्रसंगी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे तसेच डॉ सुभाष बोधनकर, डॉ महाबळेश्वर हेगडे, आसावरी जोशी आणि डॉ आनंद झंवर या संशोधकांनी लिहिलेल्या ‘जीवनदायिनी जवस’  या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

या वेळी गोपाल गौडा म्हणाले, आजच्या घडीला आपल्याकडील बहुसंख्य लोकांना लोकशाही प्रक्रिया, मंत्र्यांचे अधिकार, कायदेशीर तरतुदी, राज्यपालांचे अधिकार या विषयी काहीही माहिती नसते. याच अज्ञानामुळे लोकशाहीत चुकीच्या गोष्टी घडतात. परंतु जर कायदेविषयक साक्षरता असेल तर तुम्ही राजकीय नेत्यांनाच काय परंतु प्रसंगी न्यायाधीशांना सुद्धा कायद्याच्या चौकटीची जाणीव करून देऊ शकता. त्यामुळे ते मोठे शस्त्र आहे. त्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी कायदेविषयक साक्षरता असणे गरजेचे आहे.

मूल्याधिष्ठीत नागरिक आज समाजव्यवस्थेत तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आज सगळ्या पातळ्यांवर मूल्यांची घसरण होते आहे. राजकारणाचा दर्जा घसरतो आहे. अशा परिस्थितीत ही कायदेविषयक साक्षरता महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शहरी भागात स्मार्ट, डिजिटल प्रगतीने युक्त वर्ग साकारले जात असताना ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा अभाव हे असंतुलन दूर होणे गरजेचे आहे.

डॉ शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थी अशा सर्वांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारचे भारतीस्वयंम हे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. संशोधनाला प्राधान्य देतानाच परदेशी विद्यार्थी वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

डॉ विवेक सावजी म्हणाले, भारती विद्यापीठाने कायमच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. उच्च दर्जा राखून सातत्याने प्रवास केलेला आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे क्रांतिकारी बदल, जागतिक स्पर्धेचे बदलते रूप, गोष्टी कालबाह्य होण्याचा वाढलेला वेग या व अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे. जी जयकुमार यांनी आभार मानले. डॉ ज्योती मंडलिक आणि राजेंद्र उत्तुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page