सोलापूर विद्यापीठाकडून ‘ई-डॉक्युमेंट’साठी स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय

कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांची कल्पना

1 मे पासून सुरुवात; ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी महाराष्ट्र, संपूर्ण भारतबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे. या ई-विद्यार्थी सुविधा केंद्राची सुरुवात (बुधवारी) 1 मे 2024 पासून होणार आहे.

सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या कल्पनेतून या ई-विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती झाली आहे. या ई-केंद्राच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळण्याची सोय खूप सोपी झाली आहे. परीक्षा विभाग तसेच पात्रता विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ई-विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती केल्याचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी सांगितले.

Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उपलब्ध करून देणाऱ्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. विद्यार्थी कोठूनही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर कंपन्याना देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही लवकर व वेळेत काम होणार आहे. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांचेही सदरील ऑनलाइन विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सहकार्य लाभले आहे.

ही ई-कागदपत्रे मिळणार

  • मायग्रेशन प्रमाणपत्र
  • मार्कशीट व्हेरिफिकेशन
  • प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट
  • डिग्री सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन
  • मिडीयम ऑफ इन्स्ट्रक्शन
  • प्रोव्हिजनल एलिजिबिलिटी सर्टिफिकेट
  • अटेस्टेशन ऑफ मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट
  • इतर एज्युकेशनल सर्टिफिकेट
  • डिजिटल कन्टेन्ट प्लॅटफॉर्म अँड ऑनलाइन सर्विस

अशी असणार प्रक्रिया
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या sus.ac.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन आपणास हवे ते कागदपत्र व प्रमाणपत्र मिळण्यासाठी नोंदणी करून अर्ज करावे लागणार आहे. त्यावरून आवश्यक सहकागदपत्रे अपलोड करून व शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन ट्रेकिंग देखील करता येणार आहे. 1 मे 2024 पासून ही सुविधा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page