संशोधन आणि विकासासाठी सांख्यिकिय माहिती महत्वपूर्ण – कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर

नाशिक : संशोधन आणि विकासासाठी सांख्यिकिय माहिती महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन असल्याने विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) चे महाविद्यालयीन नोडल ऑफिसर यांच्याकरीता नुकतेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरीता केंद्र शासनाचे निती आयोग व अन्य केंद्रीय संस्था सांख्यिकीय माहितीचा मोठया प्रमाणात उपयोग करतात. त्याकरीता आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अंतर्गत पाठविण्यात आलेली माहिती महत्वपूर्ण असते. विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांनी विहित वेळेत सदर माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. या माहितीचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक निर्णय, संशोधन, शैक्षणिक, आर्थिक व अन्य बाबींच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी केला जातो. महाविद्यालयांना ‘नॅक’ मान्यता, स्कॉलरशिप, फेलोशिप आदीसाठी हा डेटा महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठाच्या संलग्नीत गुणवत्तापूर्ण पहिल्या दहा महाविद्यालयांची नावे दर्शविण्यात येतील याचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना होईल. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरीता आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) ची भूमिका महत्वपूर्ण आहे. यासाठी सर्वांचा सहभाग व महाविद्यालयांचे गुणवत्ता दर्शक रेटींग सर्वाना माहित होणे गरजेचे आहे. महाविद्यालयांनी दिलेल्या माहितीचा विश्लेषण करुन त्याची सत्यता पडताळण्यात येईल यासाठी सर्वांनी राष्ट्रीय उभारणीत आपण महत्वाचे भाग आहेत हे लक्षात ठेऊन सक्षमतेने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणात नमुद करण्यात आलेल्या बाबीतूनच महाविद्यालयाची प्रतिमा स्पष्ट होते. या सर्वेेक्षणाच्या माध्यमातूनच स्थानिक तपासणी समिती व अन्य समिती गुणांकणाचा दर्जा ठरवतात. यासाठी महाविद्यालय प्रतिनिधींनी भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणात महाविद्यालयाची माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षणाकरीता धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उच्च शिक्षणातील सर्वेक्षण अहवालातील बाबींचे निरीक्षण करण्यात येते, यासाठी सत्य माहिती द्यावी जेणे करुन शिक्षणाचा दर्जा उच्चतम ठेवण्यासाठी त्याची मदत होईल असे त्यांनी सांगितले.

आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षअंतर्गत विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयांकडून डिसेंबर 2023 पर्यंत प्राप्त माहितीचे ‘सांख्यिकीय वार्षिक पुस्तिका-2023’ चे प्रकाशन विद्यापीठाच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपकुलसचिव महेंद्र कोठावदे यांनी कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक केले. आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाची गरज, विद्यापीठे, महाविद्यालये आणि तांत्रिक संस्थांसह देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांकडून डेटा गोळा करण्याचे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट, सर्वेक्षणातून गोळा केलेला डेटा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नियोजन आदीबाबत त्यांनी माहिती दिली.

या कार्यशाळेत पुण्याचे उच्च शिक्षण संचालनालयातील सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोराडे यांनी आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाची गुणवत्ता मापण अहवालात नमुद करण्याच्या बाबी, स्टुडन्ट एनरॉलमंेट संदर्भातील माहिती, शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती सर्वेक्षणात नमुद करतांना चूका टाण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यापीठाचे सांख्यिकी अधिकारी प्रविण घाटेकर व सांख्यिकी सहायक योगेश राऊत यांनी विद्यापीठाच्या संलग्तित महाविद्यालयातील नोडल ऑफिसर यांना सांख्यिकी अहवालात नमुद करण्यासाठी आवश्यक माहिती व प्रश्नोत्तराच्या सदरात माहिती दिली. या कार्यशाळेस राज्यातील संलग्नित महाविद्यालयातील दोनशेपेक्षा अधिक नोडल ऑफिसर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page