नागपूर विद्यापीठात आयोजित विकसित भारत युवा संसद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांनी मुक्तपणे व्यक्त केल्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ विषयावर भावना
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारचा युवा कार्य व खेळ मंत्रालय तसेच नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित भारत युवा संसद स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावर मुक्तपणे आपले विचार व्यक्त केले. जिल्हास्तरीय स्पर्धा महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात मंगळवार, दि १८ व बुधवार दि १९ मार्च २०२५ रोजी पार पडली.







विकसित भारत युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूंनी आपले मत व्यक्त केले. मंगळवारी नागपूर व वर्धा तर बुधवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेता याव्या या अनुषंगाने केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केलेल्या शिफारशींची देखील मांडणी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केली.
देशात एकत्रित निवडणुका घेण्यात आल्या तर मोठ्या प्रमाणात पैसा वाचणार आहे. या पैशाचा उपयोग रुग्णालय बांधून नागरिकांना उत्तम आरोग्य व्यवस्था, शिक्षण तसेच कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न त्याचप्रमाणे सिंचनासाठी पैशाचा उपयोग होत देश सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. देशाची सुबत्ता देखील वाढेल, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत शिक्षक आणि प्राध्यापकांना कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो शिवाय कारवाईच्या धाकाने शिक्षक देखील दास्तावलेले असतात असे देखील काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.
त्याचप्रमाणे भारत हा विविध प्रांत तसेच राज्यांनी मिळून संघराज्य देश आहे. एकाच वेळी निवडणुका झाल्यास देशातील संघराज्य प्रणाली नष्ट होण्याची भीती काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. एकंदरीत विकसित भारताच्या दिशेने होत असलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना विकसित भारत होण्याच्या दृष्टीने तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन नेशन वन इलेक्शन या विषयाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ शरद साळुंखे, केतन मोहितकर, दिपाली टेकाम तसेच रासेयो संचालक डॉ सोपानदेव पिसे, जिल्हा समन्वयक डॉ राजू बुरिले यांनी कार्य केले. चारही जिल्ह्यातून १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजनात विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.