नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ क्रायोजनिक्स अभियंता डॉ श्रीकांत पट्टलवार हे ॲड्जंक्ट प्राध्यापक म्हणून नियुक्त
नागपूर : वॉशिंग्टन युके येथील ऍसिलेटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, युकेआरआय- एसटीएफसी देअर्स्बरी लॅबोरेटरी येथील वरिष्ठ क्रायोजनिक्स अभियंता डॉ श्रीकांत पट्टलवार यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात ॲड्जंक्ट प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युके येथील वरिष्ठ क्रायोजनिक्स अभियंता तथा प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या एका तज्ञ व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
डॉ श्रीकांत पट्टलवार हे त्यांच्या नव्या भूमिकेत आधुनिक भौतिकशास्त्र विषयातील अत्याधुनिक विषयांवर विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण तसेच सखोल ज्ञान मिळविण्याची संधी मिळणार आहे. भौतिक शास्त्रातील संघनित पदार्थ प्रयोगात्मक तंत्रे आणि कमी तापमान भौतिक शास्त्रातील (संकल्पनात्मक) प्रयोग तयार करण्याची आणि सेटअप करण्याची तंत्रे या विषयावर संवाद साधत असताना डॉ पट्टलवार यांनी भौतिक शास्त्रातील अत्यंत जटिल प्रयोग सोप्या पद्धतीने करणे शक्य असल्याचे सांगितले.
भौतिक शास्त्रातील कठीण संकल्पनांना सोप्या आणि समजण्यास योग्य अशा पद्धतींमध्ये बदलण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यातून संशोधक आणि विद्यार्थी दोन्हींसाठी प्रगतीपूरक प्रयोग अधिक सुलभ होतात, असे त्यांनी सांगितले. युकेमध्ये कौशल्यपूर्ण संशोधकांची मागणी वाढत असून पीएचडी शिकणाऱ्यांसाठी दिलासादायक माहिती त्यांनी दिली. युकेमध्ये पीएचडी प्रवेश तसेच जीआरई किंवा टीओईएफएलची आवश्यकता नाही. शिवाय, आकर्षक फेलोशिप मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आशावादी उमेदवारांसाठी एक मोठी संधी असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यकर्दीला पुढे नेण्यास मदत करू शकते, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संशोधन तसेच माहितीच्या आदान-पधानास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्वागत करण्यास उत्साहित आहे. तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात महत्वपूर्ण बदल होत नवीन संधी निर्माण होईल, असे विभाग प्रमुख डॉ ओ पी चिमणकर यांनी सांगितले. विभागप्रमुख डॉ ओ पी चिमणकर यांनी डॉ श्रीकांत पट्टलवार यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, डॉ राजू हिवसे यांनी डॉ श्रीकांत पट्टलवार यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे समन्वयन आयक्युएसी संचालक डॉ स्मिता आचार्य यांनी केले. यावेळी डॉ विलास सप्रे, डॉ अच्युत देशपांडे, डॉ सुभाष कोंडावार, डॉ उमेश पलिकुंडवार यांच्यासह विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.