शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारे स्वामीनाथन हे सर्वांसाठी आदर्श – डॉ. व्ही . एम मायंदे
डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी एमजीएममध्ये आयोजित चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि. २० : स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक प्रश्न होते. त्यात अन्न सुरक्षेचा प्रश्न महत्वपूर्ण होता. आपला देश अन्नाच्या बाबतीत सुरक्षित झाला याचे श्रेय भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक आणि शास्त्रज्ञ म्हणून डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांनी केलेल्या संशोधनाला दिले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारे स्वामीनाथन हे आपणा सर्वांसाठी आदर्शवत असे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही . एम मायंदे यांनी यावेळी केले.हरित क्रांतीचे जनक डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेण्यासाठी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी आणि एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर, गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष चर्चासत्रामध्ये श्री. मायंदे बोलत होते.
मायंदे म्हणाले, हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांना ओळखतो त्याचप्रमाणे हरिकक्रांती आणणण्यामध्ये देशाचे तत्कालीन कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ, शेतकरी, अधिकारी आणि राजकीय शक्ति या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे आपल्या देशामध्ये हरित क्रांती होऊ शकली. आर्थिक तत्वावर फायदा देणारी, पर्यावरण संतुलित आणि सामाजिक स्थिरता असणारी शेती करणे आवश्यक असून या माध्यमातून सदाबहार क्रांती आणि शाश्वत शेती सध्याच्या काळाची गरज आहे. या पद्धतीच्या शेतीचे स्वप्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांनी बाळगले होते.
या चर्चासत्रात कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, प्रा.डॉ.एम. वसुंधरा, विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. एच.एम. देसरडा, प्रगतशील शेतकरी दादासाहेब शिंदे आदि तज्ञ मान्यवरांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला आणि उपस्थितांशी संवाद साधला. या चर्चासत्रासाठी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, संचालक प्रा.ए.एस.खेमनर, एमजीएम गांधेली संचालक डॉ. के. ए. धापके आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या चर्चासत्रात एम.एस.स्वामिनाथन यांच्या वैज्ञानिक योगदानावरील माहितीपट दाखवण्यात आला. या चर्चासत्राचे प्रास्ताविक संचालक प्रा.ए.एस.खेमनर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. आर. सुरवसे यांनी तर आभार डॉ.निलेश मस्के यांनी मानले.