शिवाजी विद्यापीठातील सत्यशीला घोंगडे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय परिषदेत तृतीय क्रमांक
भौतिकशास्त्र अधिविभागात संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक संशोधनास प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे प्रोत्साहन
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चतर्फे दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ‘नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजीचा मेडिकल क्षेत्रामध्ये वापर’ यावर विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यांत आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत ३५० हून अधिक संशोधकानी सहभाग नोंदवला होता. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत १६ हून अधिक देशातील वक्त्यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत पोस्टर प्रदर्शनामध्ये २१० तर मौखिक सादरीकरणामध्ये ६० संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत शिवाजी विद्यापीठातील, भौतिकशास्त्र अधिविभागातील सत्यशीला दत्तात्रय घोंगडे यांनी संरक्षण उपकरणांसाठी मायक्रोतरंग शोषण या विषयावर मौखिक सादरीकरण केले होते. सदर सादरीकरणासाठी त्यांना तृतीय क्रमांक मिळाला. सध्याच्या काळात विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे विद्युत चुंबकीय तरंगांचे प्रदूषण होते, ते कमी करण्यावर त्यांचे संशोधन सुरु आहे.
भौतिकशास्त्र अधिविभागातील अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशीला दत्तात्रय घोंगडे यांचे संशोधन कार्य चालू आहे. सदर मौखिक सादरीकरणामध्ये प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर परिषदेस प्रा. डॉ. अजयन विनू, खलिफा युनिव्हार्सिटी अबुधाबीचे प्रा. डेनियर चोई, द. कोरियाच्या चुंगअंग विद्यापीठाचे जोन टील पार्क, कोरिया विद्यापीठाचे प्रा. हन यंग वू, अमेरिकेतून डॉ. आसीम गुप्ता, आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. सी. डी. लोखंडे, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. मेघनाद जोशी आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू पी. एस. पाटील आणि कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले.